संत तुकारामनगरातील दुर्घटनेप्रकरणी घर मालकावर गुन्हा

0

पिंपरी-चिंचवड : जुन्या घरावर सुरू असलेल्या वाढीव बांधकामाची भिंत अंगावर कोसळल्याने एका 14 वर्षीय बालकास गंभीर दुखापत झाली होती. ही घटना पिंपरी, संत तुकारामनगरात गुरुवारी घडली होती. याप्रकरणी घर मालकाविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्वर उस्मान शेख (वय 40) असे बांधकाम करणार्‍या घर मालकाचे नाव आहे. त्यांच्या घराची भिंत पडून निनाद सुधीर गोनते (वय 14, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) हा जखमी झाला होता.

दुचाकींचेही झाले नुकसान
निनाद हा किराणा दुकानातून बिस्कीटचा पुडा आणण्यासाठी गेला होता. मात्र, बिस्कीट पुडा घेऊन घरी परतत असताना त्याच्या अंगावर भिंत कोसळली होती. त्यात निनादच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्याच्यावर कासारवाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमध्ये इमारतीजवळ लावलेल्या अनेक दुचाकींचेही नुकसान झालेले होते. याप्रकरणी घर मालक अन्वर शेख याच्यावर गंभीर दुखापतीस कारण ठरल्याचा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.