पिंपरी-चिंचवड : देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची संस्थानकडून जय्यत तयारी केली आहे. यंदा दिंडी सप्ताहाला गाथा पूजन करून सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालखी प्रस्थानाच्या दिवशी भजनी मंडपात पास असणार्यांना दोनशे जणांनाची व्यवस्था केली असून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी देऊळवाड्यात व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
सोहळ्यात 330 दिंड्या
याबाबत पालखी सोहळा प्रमुख सुनील दामोदर मोरे म्हणाले, आषाढी वारीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात 330 दिंड्या आहेत. या दिंड्यांना संस्थानने पत्रव्यवहार केला आहे. दोन दिवसांत दिंड्या देहूत दाखल होतील. संपूर्ण सोहळ्यात भाविकांचे श्रद्धास्थान असलेला संत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या रथाचे दुरुस्तीचे काम संस्थानने देऊळवाड्यात केले आहे. पालखी रथाला बैलजोडी जुंपण्यासाठी दोन शेतकर्यांना मान देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पालखी मार्गावर रथावरील गर्दी कमी करण्यात येणार आहे. भाविकांना पालखी मार्गावर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन व्यवस्थित व्हावे, यासाठी खास सोय करण्यात आली आहे.
सुरक्षेसाठी रथावर कॅमेरे
सुरक्षिततेच्या दृष्टीने रथावर चार कॅमेरे बसविण्यात आले आहे. भाविकांना पालखी मार्गावर विविध सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाच्या पाणी, आरोग्य, वीज, रस्ते विभागाला पत्रव्यवहार केला आहे. त्याचप्रमाणे पालखी मार्गावर निवार्यासाठी तंबूची व्यवस्था केली आहे. पालखी मार्गावरील अन्नदानासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. टाळ, मृदंग, पखवाज, वीणा व पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यात आली असून, मानकरी सेवेकरी, दिंडी प्रमुखांना पत्र्यव्यवहार केला आहे. मुख्य देऊळवाड्यातील स्वच्छतेसाठी 50 कर्मचारी व 6 सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहेत.
प्रस्थानादिवशीच दिंड्यांना प्रवेश
महाद्वारातून पालखी प्रस्थानाच्या दिवशी दिंड्यांना प्रवेश देण्यात येणार असून, तपोनिधी नारायण महाराज प्रवेशद्वारातून बाहेर जाण्याचा मार्ग आहे. सुरक्षिततेसाठी देऊळवाड्यात 22 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच वैकुंठस्थानी चार कॅमेरे बसविले आहेत. मंदिराला फुलांची सजावट करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या रथाला, अब्दागिरी, गरुडटक्के यांना मंगळवारी (ता. 3) पॉलिश करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यासाठी संस्थानच्या वतीने गाथा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मंदिराला यंदा दगडी स्वरूपात भाविकांना पाहावयास मिळणार आहे. संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, पालखी सोहळा प्रमुख अशोक मोरे, विठ्ठल महाराज मोरे, विश्वस्त सुनील मोरे, अभिजित मोरे, जालिंदर महाराज मोरे उपस्थित होते.