मुक्ताईनगर :- महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे चार प्रमुख धामांपैकी एक आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी व योगीराज चांगदेवाचे तपस्थळ चांगदेव येथे महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त शनिवारपासून दिंड्यासह पालख्या दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी दुपारपर्यंत 70 वर पालख्या दाखल झाल्या होत्या तर हा आकडा रात्री उशिरापर्यंत दिडशे ते दोनशेवर जाण्याची शक्यता आहे. महाशिवरात्रीपर्यंत चालणार्या यात्रोत्सवात विदर्भ, मराठवाडा खान्देशासह मध्यप्रदेशातून हजारो वारकरी पायी दिंडीने चांगदेव-मुक्ताई दर्शनाला मजल-दरमजल करीत दाखल होत आहेत.
आज होणार नगर परीक्रमा
झेंडूजी महाराज बेळीकर, गोमाजी महाराज नागझरी, गजानन महाराज शेगाव, रुक्मिणी माता कौडण्यपूर, सखाराम महाराज, सखारामपूर, भोजने महाराज, अटाळीकर, सोनाजी महाराज सोनाळा ,रूपराव महाराज, जगन्नाथ अंजाळेकर महाराज, दिगंबर महाराज , चिनावल, पंढरीनाथ महाराज या मानाच्या प्रमुख दिंडीपालख्यांसह 200वर दिंड्या शनिवारी रात्री उशिरापर्यंत येथे दाखल होणार आहेत. प्रत्येक दिंडी फडावर भक्तीचा जागर चालेल. एकादशीनिमित्त रविवार, 11 रोजी नगर परीक्रमा होवून पालख्या 13 रोजी महाशिवरात्रीस मुक्ताईसमवेत चांगदेवाच्या दर्शनासाठी रवाना होतील.