संत मुक्ताईच्या दर्शनासाठी लागली वारकर्‍यांची रिघ

0

मुक्ताईनगर : हिंदू धर्मात मार्गशिर्ष महिन्याला फार महत्त्व आहे. प्रत्येक पंथात मार्गशिर्षमध्ये भगवंताची उपासना केली जाते. त्याचप्रमाणे वारकरी सपंप्रदायात सुध्दा या महिन्यात वारकरी मोठ्या श्रध्देने देवस्थानांवरती दर्शनासाठी जात असतात. त्यातच या मार्गशिर्ष महिन्याच्या वद्य एकादशीच्या वारीला फार महत्व आहे. याच अनुशंगाने श्रीक्षेत्र मेहूण येथे भक्तांची दर्शनासाठी रीघ लागली होती. मुक्ताई शरणंम मुक्ताई शरणंम च्या जयघोषाने संत मुक्ताईचे दर्शन घेत अवाघी मेहूण नगरी दुमदुमली.

मेहूण तापीतीरी दिंड्यांचा मुक्काम
दरवर्षी मार्गशिर्ष वद्य एकादशीच्या वारीला श्रीक्षेत्र मेहूण येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्याचप्रमाणे यावर्षी सुध्दा वारीला असंख्य दिंड्यांसह वारकरी भाविक दर्शनाकरीता उपस्थित होते. त्यात श्रीक्षेत्र मेहूण येथे सध्या सोपानकाका समाधी सोहळ्यानिमित्त संगीतमय भागवत कथा व महालक्ष्मी कुबेर महायज्ञ सुरु असल्याने येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. असंख्य भाविक या सोहळा सप्ताहासाठी मुक्ताई देवस्थान मेहूण (तापीतीर) येथे उपस्थित आहे.

शनिवारी सकाळी मुक्ताई देवस्थानावरती काकडा, मुक्ताई स्तोत्र झाल्यानंतर आईसाहेब मुक्ताईच्या मुर्तीला मंगल स्नान घालून महापूजा करण्यात आली. त्यानंतर आलेल्या भाविकांनी मुक्ताइचे दर्शन घेतले. नंतर सकाळी 10 ते 12 हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली चातुर्मास्ये (चातुर्मास्ये महाराज मठ पंढरपूर) यांचे किर्तन झाले. या एकादशीनिमित्त तसेच सप्ताहनिमित्त ईच्छापूर (ता. बुर्‍हाणपूर) येथील ग्रामस्थ मंडळीकडून सप्ताहाला उपस्थित असलेल्या तसेच वारीला येणार्‍या दिंड्यांसह भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. दिवसभरात भागवत कथा, हरीपाठ, तसेच रात्री हरिभक्त परायण प्रकाश महाराज जवंजाळ (महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ अध्यक्ष चिखली) यांचे किर्तन झाले. आज वारीला आलेली भाविक मंडळी, दिंड्या, मुक्ताई देवस्थान मेहूण तापीतीरी येथे मुक्कामी आहेत.