संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्यास पांडुरंग पालखी सोहळ्याची लागणार हजेरी

0

सोमवारी पालखी सोहळा मुक्ताईनगराकडे करणार प्रस्थान ; 29 रोजी अंतर्धान समाधी सोहळा

मुक्ताईनगर- श्री क्षेत्र कोथळी येथे 29 रोजी होत असलेल्या संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्यास श्री पांडुरंग पालखी सोहळ्याची हजेरी असणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व श्री संत मुक्ताबाई संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचे सोमवार, दि.27 मे रोजी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान होणार आहे. श्री पांडुरंग पादुकांची पहाटे सहा वाजता विधीवत पूजा झाल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने मानकर्‍यांचा सन्मान होईल व हा सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान करेल.

भुसावळात निवृत्तीनाथ व श्री पांडुरंग पादुका भेटीचा सोहळा
27 रोजी सकाळी नऊ वाजता करमाळा, दुपारी 12 वाजता अहमदनगर, दुपारी चार वाजता नेवासा फाटामार्गे औरंगाबाद येथील श्री गजानन महाराज मंदिरात सायंकाळी सात वाजता मुक्कामी पोहोचेल. मंगळवार, 28 रोजी सकाळी सिल्लोड, दुपारी जामनेर, सायंकाळी कुर्‍हेपानाचे मार्गे सायंकाळी पाच वाजता श्री विठ्ठल मंदिर, भुसावळ येथे पादुका पोहोचतील. येथे संत निवृत्तीनाथ व श्री पांडुरंग पादुका भेटीचा सोहळा होईल तर पंढरपूरहून निघालेल्या संत नामदेव महाराजांच्या पादुका मुक्ताईनगर मुक्कामी पोहोचतील. बुधवार, 29 रोजी श्री क्षेत्र कोथळी येथे श्री संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा होत असून या सोहळ्यासाठी श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळा पोहोचेल. संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळ्याच्यानिमित्ताने कीर्तनाची सेवा संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. केशवदास नामदास करतील तर रात्री संत निवृत्तीनाथ संस्थानचे विश्वस्त ह.भ.प.जयंत महाराज गोसावी कीर्तन सेवा करतील. गुरुवार, 30 रोजी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र कोथळी ते श्री क्षेत्र मुक्ताईनगर दिंडी मिरवणूक होईल. त्यानंतर हा सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथे मुक्कामी विसावेल. शुक्रवार, 31 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 द्वादश पारणे सोहळा होईल आणि त्यानंतर श्री पांडुरंग पादुका पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू होईल. मलकापूर, मोताळा, बुलढाणामार्गे हा सोहळा श्री क्षेत्र चिखली येथील श्री रेणुका माता मंदिरात मुक्कामी पोहोचेल. शनिवार, 1 जून रोजी देऊळगाव राजा, जालना, अंबड, गेवराईमार्गे बीड मुक्कामी पोहोचेल. बीड येथील श्री हनुमान मंदिरात पालखी सोहळ्याचा मुक्काम आहे. रविवार, 2 जून रोजी कुंतलगिरी फाटा, बार्शी येथील श्री भगवंत मंदिर, कुर्डूवाडीमार्गे सायंकाळी सहा वाजता हा सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल. यावेळी पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, सूर्यकांत भिसे आदी उपस्थित राहणार आहे.