जळगाव : ग्यानबा तुकारामच्या गजरात मानाच्या 10 पालख्या आज एसटीनं पंढरपूरकडे रवाना होत आहेत. जिल्ह्यातील संत मुक्ताई संस्थानच्या संत मुक्ताई पालखीचा पहिला मान असतो. जळगाव जिल्ह्यातील या मानाच्या पालखीचं आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने प्रस्थान झालं. मुक्ताई नगर येथील संत मुक्ताई पालखीचं राज्याच्या अध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायात मोठं मानाच स्थान आहे. राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या विविध पालख्यांपेक्षा संत मुक्ताई पालखी सर्वात आधी निघत असते. तशी ती पंढरपूर येथेही संत मुक्ताई पालखीचं पहिल्यांदा आगमन होत असतं. पण यंदा कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी पायी वारी निघालेली नसल्यानं मानाच्या 10 पालख्यांनाच पंढरपूरला जाण्याची मुभा देण्यात आलीय. त्यासाठी प्रत्येक पालखीसोहळ्यासोबत 40 वारकऱ्यांना परवानगी आहे. पण त्यांना कोरोना चाचणीची अट कायम ठेवण्यात आली आहे.