संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
पहिला मुक्काम सातोड गावी : यंदा तीन दिवस अगोदर पालखी पोहोचणार विठूरायाच्या भेटीला
मुक्ताईनगर : कोरोना निर्बंधामुळे गेल्या दोन वर्षांपासून पायी आषाढीवारीत खंड पडला होता. आता निर्बंध हटले आहेत आणि पायी वारीचा मार्ग मोकळा झाला. कोथळी येथून संत मुक्ताईची आषाढी वारी पालखी शुक्रवार, 3 जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. 5 जुलै रोजी तीन दिवस आधीच हा सोहळा पंढरपूरमध्ये दाखल होईल. शुक्रवारी सकाळी 11 वाजता कोथळी येथील मंदिरातून आदिशक्ती श्री संत मुक्ताईच्या पादुका पालखी चे प्रस्थान नवीन मुक्ताई मंदिराकडे झाले. मुक्ताईच्या जयघोषात व टाळमृदुंगाच्या गजरामध्ये मुक्ताईनगरी दुमदुमली होती.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रोहिणी खडसे, मध्यप्रदेशचे खासदार ज्ञानेश्वर पाटील ,मध्य प्रदेशच्या माजी मंत्री अर्चना चिटणीस, मुक्ताईनगर च्या प्रभारी नगराध्यक्ष मनीषा पाटील, मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख हभप रवींद्र हरणे महाराज, हभप उद्धव जुनारे महाराज , विनोद सोनवणे, विनायकराव हरणे, ज्ञानेश्वर हरणे, मुक्ताई संस्थानचे विश्वस्त यांचेसह भाविक वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आषाढी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये दाखल होणार्या संतांच्या मानाच्या पालख्यांमध्ये संत मुक्ताई पालखीचे महत्त्व आहे. राज्यात सर्वाधिक लांब अंतरावरून पायी येणारी ही एकमेव पालखी आहे.. जवळपास 700 किमी एका बाजूने प्रवास या पालखी सोहळ्याचा असतो.
आठ दिवस मुक्ताई पालखी पंढरीत
यंदा तिथीत वाढ असल्याने तीन दिवस अगोदर आषाढ शुद्ध षष्ठीस सोहळा पंढरपुरात पोहोचेल. त्यामुळे वारकर्यांना गर्दी आधीच पांडुरंगाचे दर्शन घेता येईल. आठ दिवस मुक्ताई पालखी सोहळ्याचा मुक्का पंढरपुरात असेल. या दरम्यान विविध कार्यक्रम होतील. यंदा संत मुक्ताईंचे समाधी सप्त शतकोत्तर वर्ष आहे. त्यामुळे वारी भाविकांची संख्या वाढेल, असा कयास आहे. त्यादृष्टीने नियोजन संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, सोहळा प्रमुख रवींद्र हरणे, व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे यांच्या मार्गदर्शनाखाली आहे.