माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नांना यश
मुक्ताईनगर:- माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नांनी 25 कोटींचा श्री संत मुक्ताई विकास आराखडा मंजूर करण्यात आला असून त्यातील चार कोटींचा निधी प्राप्त झाल्याची माहिती खडसे यांचे स्विय्य सहाय्यक योगेश कोलते यांनी दिली. श्री संत मुक्ताई मंदिर कोथळी या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी खडसे सदैव प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे 25 कोटींच्या श्री संत मुक्ताई विकास आराखड्यास जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने ग्रामविकास विभागाकडील 28 मार्च 2018 च्या शासन निर्णयानुसार 908.67 लक्ष एवढा किंमतीच्या कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी चार कोटींचा निधी प्राप्त झाला असून आतापर्यंत 15 कोटींची विकास कामे पूर्णत्वास आली आहेत.
वॉटर पार्क लवकरच निघणार निविदा
मुक्ताई मंदिर कोथळी येथे तीर्थक्षेत्र विकास योजनेतून व पर्यटन विभागाच्या निधीतून यापूर्वी अँम्पीथिएटर, टुरेरेस्ट रीसेप्शन सेंटर, रेस्टॉरंट, छोटा स्वीमिंग टँक, दोन भव्य सभामंडप व भक्ती निवास तसेच भवानी मंदिर, महादेव मंदिर, विठ्ठल मंदिर, कृत्रिम कालवा तयार करणे सभामंडप, बालोद्यान आदी कामे पूर्ण झाली असून संत मुक्ताईचे पुरातन स्वरूपाचे काळ्या पाषणातील दगडी मंदिर पूर्णत्वास येत आहे. यापूर्वी राज्याच्या पर्यटन विभागाकडून वॉटर पार्कसाठी पाच कोटी प्राप्त झाले असून त्याची निविदा प्रगती प्रथावर आहे.