प्रती टन कारखान्याला दोन हजार रुपये भाव जाहीर
मुक्ताईनगर: शहरातील संत मुक्ताई शुगर अॅण्ड एनर्जी लि.साखर कारखान्याच्या सहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून जिल्हा बँक अध्यक्षा तथा कारखान्याच्या व्हा.चेअरमन अॅड.रोहिणी खडसे खेवलकर यांच्याहस्ते करण्यात आला. प्रसंगी बॉयलर अग्निप्रदीपन माजी सभापती विलास धायडे यांच्याहस्ते सपत्नीक करण्यात आले. कारखान्याच्या वतीने उसाचे दर दोन हजार रुपये प्रती मेट्रिक टन जाहीर करण्यात आले.
ऊस पुरवठादारांचा सत्कार
प्रसंगी गेल्या वर्षी ज्या ऊस उत्पादक शेतकर्यांनी व ऊस वाहतूकदार ठेकेदारांनी जास्तीचा ऊस पुरवठा केला त्यांचा सत्कार करण्यात आला. कारखाना कार्यक्षेत्रात जास्तीत-जास्त ऊस लागवड करावी जेणेकरून ऊस वाहतूक खर्चातील बचत होऊन शेतकर्यांना अधिकचा लाभ कारखाना देऊ शकेल, असे आवाहन करीत 20019-20 च्या गळीत हंगामासाठी कारखान्याकडून दोन हजार रुपये मॅट्रिक टन भाव देण्यात येणार आहे, असे कारखान्याचे व्हाईस चेअरमन रोहिणी खडसे यांनी जाहीर केले. यावेळी संत मुक्ताई शुगर अॅण्ड एनर्जी ली.चे चेअरमन शिवाजीराव जाधव, संचालक निवृत्तीभाऊ पाटील, विलास धायडे, रामभाऊ पाटील, विश्वनाथराव चौधरी, राजेंद्रजी चौधरी, रामदास पाटील, जनरल मॅनेजर ए.एम.देवरे, चीफ इंजिनियर टी.डी.सुरवसे, गोपाळ पाटील, रावीकुमार भोसले यांच्यासह कारखान्याचे अधिकारी कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.