जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मंजूरी
जळगाव – जिल्ह्यातील संत मुक्ताई साखर कारखान्याला 55 कोटी रूपयांचे कर्ज देण्याला जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने मंजूरी दिली. त्यासोबतच मधुकर सहकारी साखर कारखान्यालाही वीजबिलासाठी 20 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची सभा आज पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन अॅड. रोहीणी खडसे ह्या होत्या. याप्रसंगी व्हा. चेअरमन आ. किशोर पाटील, संचालक संजय पवार, गुलाबराव देवकर, नानासाहेब देशमुख, राजेंद्र राठोड, तिलोत्तमा पाटील, डॉ. सुरेश पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, गणेश नेहते आदी उपस्थित होते. संत मुक्ताई साखर कारखान्याला नियमबाह्य कर्ज देण्याचा घाट जिल्हा बँकेने घातला असल्याचा आरोप अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत केला होता. त्यामुळे आज होणार्या संचालक मंडळाच्या सभेकडे लक्ष लागले होते. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत अजेंड्यावर संत मुक्ताई साखर कारखान्याचा विषय आल्यानंतर या कारखान्याला 55 कोटी रूपयांचे अर्थसहाय्य देण्यास संचालकांनी मंजूरी दिली. तसेच थकबाकीदार असलेल्या मधुकर सहकारी साखर कारखान्यालाही वीजबिलासाठी 20 लाख रूपये देण्याचाही विषय मंजूर करण्यात आला.
प्रशासकीय टिपणी सकारात्मक असल्यानेच कर्ज मंजूर
जिल्हा बँकेकडुन नियमीत फेड करणार्या खाजगी संस्थांना कर्ज मंजूर केले जाते. संत मुक्ताई साखर कारखान्याकडुनही कर्जाची नियमीत फेड होत असल्याने आणि प्रशासकीय टिपणी ही सकारात्मक असल्यानेच 55 कोटी रूपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याचे संचालकांनी सांगितले.
संत मुक्ताईला नियमानुसारच कर्ज मंजूर – आ. किशोर पाटील
गत दहा वर्षापासून मी या जिल्हा बँकेत आहे. या कालावधीत कुठल्याही संस्थेला नियमबाह्य कर्ज देण्यात आलेले नाही. बँक चालवायची असेल तर खाजगी उद्योगांना अर्थसहाय्य करणे गरजेचे आहे. मागच्या काळातही असे आरोप झाले. मात्र संत मुक्ताई कारखान्याकडुन व्याजासह 5 कोटी रूपयांचा हप्ता नियमीतपणे बँकेला मिळत होता. गुडविल तपासूनच संत मुक्ताईला कर्ज मंजूर करण्यात आले आहे. तसेच 55 कोटी रूपयांच्या कर्जापोटी संत मुक्ताईकडुन 95 कोटींची मालमत्ता तारण करण्यात आलाी आहे. संत मुक्ताई कारखान्याला कुठलेही नियमबाह्य कर्ज देण्यात आले नसल्याची माहिती जिल्हा बँकेचे व्हा. चेअरमन तथा शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.