मुक्ताईनगर । महाराष्ट्रात वैभवशाली परंपरा लाभलेल्या वारकरी पंथाचे आराध्य दैवत भगवान पांडूरंगाचे दर्शनाला पायी जाण्याची शेकडो वर्षांची परंपरा संताचे विचारावर विश्वास ठेवून आजच्या धावपळीचे काळातही टिकून आहे. राज्यातून वा परराज्यातून वारकरी संताचे दिंडी-पालखी सोहळे आषाढी- कार्तिकीस लाखो वारकर्यांसह शेकडो दिंड्या, पालख्या पंढरीत दाखल होतात. त्यात प्रमुख मानाचे सात पालखी असून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत नामदेव या संतांच्या पालख्यांचा समावेश आहे. वाखरीतुन पंढरीत प्रवेश ह्याच क्रमाने होतो. त्यातीलच सर्वात लांब अंतराची आई मुक्ताईची पालखी श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथून मंगळवार 30 रोजी सकाळी 10 वाजता प्रस्थान करित आहे.
संस्थानतर्फे वारकर्यांसाठी सुविधा
308 वर्षांची अखंड परंपरा जोपासत 700 किमी 34 दिवसांचा प्रवास करित मलकापूर, बुलढाणा, चिखली, देऊळगावराजा, जालना, गेवराई, बिड, भूम, माढा, आष्टी मार्गाने 1 जुलै रोजी पंढरीत दाखल होईल. पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी भाविकांचे सोयीसाठी संत मुक्ताई संस्थानतर्फे दोन ट्रक अवजड सामानासाठी व एक पाण्याचे टँकर तसेच जिल्हा परिषदेच्या वतीनेे आरोग्य सुविधा करिता आरोग्य पथकासह रूग्णवाहीका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुध्दा पिण्याचे पाणी पुरवठा टँकर सोबत देण्यात येतो.
वारीसाठी लागतो 48 दिवसांचा कालावधी
मध्यप्रदेश, खान्देश व विदर्भातुन जाणारा मानाचा एकमेव मुक्ताई पालखी सोहळा असल्याने या भागातील वारकरी भाविकांची संख्या भरपूर असते पुर्वी हा सोहळा जाताना 42 व परतीला 48 दिवस एकूण 90 दिवस लागायचे त्यात बदल करून सध्या जाताना 33 व येताना 21 असे 54 दिवसांचा वेळ लागतो मुक्ताई पालखी सोहळा 1 जुलै रोजी संत नामदेव महाराज पालखी सामोरे येवून आईसाहेबांना चंद्रभागास्नान करुन भुवैकूंठ पंढरपूरात घेवून जातील. तसेच 3 रोजी वाखरी येथे मानाचे पालखी सोबत माऊली मुक्ताई भेट सोहळा होईल.
आठ दिवस पंढरपूर मुक्कामानंतर पौणिमेला 9 जून रोजी गोपाळपूर येथे काला व त्याच दिवशी मंदीरात जावून देवाची भेट घेत परतीला निघतील व 29 रोजी मुक्ताईनगरीत आगमन सोहळ्याने वारीची सांगता होईल.
तरी मुक्ताई फडावरील फडकरी किर्तनकार वारकरी भाविकांनी 30 मे रोजी जुने मंदिर येथूनच सोहळ्यात सहभागी व्हावे .
ज्यांना पायी वारी शक्य नसेल त्यांनी जुने मंदिर ते नविन मंदिर प्रस्थान सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन अॅड.रविंद्र पाटील व विश्वस्त मंडळ, सोहळा प्रमुख हभप रविंद्र महाराज हरणे यांनी केले आहे.