हडपसर : ‘कांदा मुळा भाजी अवघी, विठाई माझी, मोटविहिरी दोरी, अवघी व्यापिली पंढरी। लसूण, मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा श्रीहरी’ हा अभंग म्हणत नगरसेवक मारुती तुपे यांनी संतशिरोमणी सावता माळी यांचा जीवनपट उलगडला. संत शिरोमणी सावता माळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री संतशिरोमणी सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी काळे-बोराटे नगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मंदिरात कीर्तन, भजन, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
तुपे म्हणाले, आपल्या दैनंदिन जीवनाच्या कामाच्या अनुभवातून देवाची भक्ती करून संत सावता माळी जाती-जातीतून भगवद्भक्तीचा गंध फुलवत होते. ज्ञानदेव, नामदेवांच्या काळात सावताबाबा आपल्या रोजच्या उद्योगालाच हरिभक्ती समजून त्यात पूर्णपणे रंगून गेले होते. देव सदासर्वकाळ तुमच्या सान्निध्यातच वसतो, हे तत्त्व त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या व्यवहाराने सामान्य जनांच्या मनावर ठसवले.
यावेळी ससाणेनगर येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास नगरसेवक तुपे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर संत शिरोमणी सावता माळी महाराज यांची पालखी, मिरवणूक काढून पुष्पवृष्टी करण्यात आली. पालखी सोहळा काळे-बोराटेनगर येथे मंदिरात आल्यानंतर महाआरती झाली. यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी नगरसेवक संजय घुले, संजय शिंदे, बारवकर काका, प्रशांत सुरसे आदी उपस्थित होते.
या सोहळ्याचे आयोजन युवा नेते गणेश बोराटे, अमोल बोराटे, राज निकम, संदीप झगडे, मुकुंद बोराटे, संजय बोराटे, हर्षद ससाणे, प्रवीण लकडे, सागर रायकर, अनिल बनकर, मुकेश वाडकर, अमोल डांगमाळी, अतुल बंडगर, निखिल चव्हाण, गणेश नवले आदींनी केले.