पिंपरी : संत साहित्य हे एकीकडे लोकजीवनाचे उत्कट भावदर्शन आहे. तर दुसरीकडे मानवी जीवनाला सुंदरतेकडे नेणारे जीवन दर्शन आहे. अनुभूतीचे लोकसंवादित प्रकटीकरण म्हणजेच संत साहित्य होय, असे प्रतिपादन संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले. चिंचवड, श्रीधरनगर येथील श्री दत्त सेवा मंडळाच्या वतीने चातुर्मास ज्ञानोत्सवाचे आयोजन केले. ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ याविषयावर डॉ. देखणे यांनी व्याख्यान दिले. यावेळी पदाधिकारी रमेश गोसावी, अनंत कुलकर्णी, जगन्नाथ चौधरी, विष्णू गुर्जर, वसंत बोरकर आदी उपस्थित होते.
वारी भक्तीचे सामाजिकरण
डॉ. देखणे म्हणाले, “संत साहित्य हे एकीकडे लोकजीवनाचे उत्कट भावदर्शन आहे. तर दुसरीकडे मानवी जीवनाला सुंदरतेकडे नेणारे जीवन दर्शन आहे. पंढरपूरचा वारी सोहळा हा संत विचारांचा सांस्कृतिक अविष्कार आहे. ते नैतिकतेचे चालते बोलते विद्यापीठ आहे. तत्वक्ते अद्वैताचे चिंतन घडवितात. तर वारकरी त्याची अनुभूती घेतात. अद्वैताचे दैवतात आणून, दैवताला अदैवताची नटवण्याची किमया भक्ती संप्रदायातून झाली. जिथे ज्ञान आणि प्रेम हातात हात घालून चालतात तिथेच भक्तीचे व्यासपीठ उभे राहते. वारी म्हणजे भक्तीचे सामाजिकरण होय.
संत परंपरा का अवतरली
महाराष्ट्रात संत परंपरा का अवतरली याचा वेध घेताना लक्षात येते की सन 1318 मध्ये यादवाचे साम्राज्य धुळीस मिळाले. 14, 15, 16 वे शतक परकीयांच्या आक्रमणाखाली अंध:कारात वाटचाल करीत होते. समाज अत्याचाराने बरबटलेलेच या दंभाचाराने गुरफटला होता. बुवाबाजीने गांजला होता. भेदाभेदाच्या कल्पनेने आणि अज्ञानाने पिचला होता. या अगतिक समाजामध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि त्याची हरवलेली आत्मनिर्भरता पुन्हा प्रकट करण्यासाठी संत चळवळीचा जन्म झाला आणि भक्ती पंथाचा उदय, देशभाषेची प्रतिष्ठा कर्मप्रधान जीवनाची सांगाती या तीन गोष्टींवर आधारित संत प्रबोधन उभे राहिले. त्यांनी सामाजिक समतेसाठी आणि मुल्याधिष्ठित आचार दर्शनातही भक्तीचे व्यासपीठ उभे केले आणि ज्ञानदेवांनी भक्तीमंदिराला भागवत धर्माचा, महाराष्ट्र सार चिद्विलास तत्वचिंतनाचा आणि सामाजिक विचार दर्शनाचा पाया घातला आणि त्या पायावर महाराष्ट्र धर्माचे आणि संस्कृतीची इमारत भक्कमपणे उभी राहिली.