संदेश फलकाद्वारे पोलिसांची ‘हेल्मेट’ जागृती

0

पुणे : ‘हेल्मेट वापरा सुरक्षेसाठी, आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित’ अशाप्रकारे हेल्मेट वापराचे संदेश देत विद्यार्थी आणि वाहूतक पोलिसांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली. चित्रांच्या स्वरुपात तयार केलेली संदेश फलक हाती घेऊन स्वारगेट येथील स्वा. केशवराव जेधे चौकात बुधवारी सकाळी एक उपक्रम राबवण्यात आला. यात विद्यार्थ्यांसह वाहतूक पोलिसांनीही सहभाग घेतला.

वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नागनाथ वाकुडे, स्वारगेट वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर ढगे, कला प्रसारणी सभा न्यासाचे सचिव पुष्कराज पाठक यात सहभागी झाले होते. शहरात नववर्षापासून हेल्मेटसक्तीच्या कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. यानंतर काही लोकांकडून याला विरोध सुरू झाला आहे. मात्र, स्वः सुरक्षेसाठी हेल्मेट आवश्यक असून त्याला विरोध करु नका. हेल्मेट ही सक्ती नसून सुरक्षितता आहे. हेल्मेट नसल्याने होणारे अपघात धोकादायक असून हे टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करा, याविषयी महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी हातात फलके घेऊन लोकांना आवाहन केले. तसेच, अशा प्रकारचे पोस्टर्स स्वारगेट चौकात लावण्यात आले असून इतर चौकातही ते लावण्यात येणार आहेत.

हेल्मेट तरुणाईच्या स्मार्टनेसचे सिम्बॉल व्हावे

सुरक्षेसाठी सर्वांनी हेल्मेट वापरण्याची गरज आहे. पुणेकरांनी हेल्मेटचे महत्त्व समजावून घेत स्वतःहून ते वापरण्यासाठी पुढाकार घ्यावा. हेल्मेट हे तरुणाईच्या स्मार्टनेसचे सिम्बॉल व्हावे, असे स्वारगेट वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर ढगे यांनी यावेळी सांगितले.