संपकरी डॉक्टरांवर कारवाईसाठी गोंधळ, सभागृह दोनदा तहकूब

0

मुंबई : धुळ्यातील डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर डॉक्टरांनी केलेल्या संपामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांच्या निवेदनानंतर सभागृहातील सर्वच सदस्य आक्रमक झाल्याने सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले. डॉक्टरांवरील हल्ले हे निषेधार्ह आहेत मात्र सामान्य रुग्णांना अशा प्रकारे वेठीस धरणे देखील चुकीचे असल्याचे सांगत शिवसेनेच्या सदस्यांनी वेलमध्ये उतरुन गोंधळ घातल्याने दोनदा सभागृह स्थगित करावे लागले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केल्यानंतर पुन्हा विरोधकांशिवाय कामकाज सुरळीत पार पडले.

मुख्यमंत्री संतापले- देव आहात, दानव बनू नका

अनेकदा विनंती करून सरकार डॉक्टरांच्या भूमिकेपुढे हतलब झाले असून आता सामान्य रुग्णांचे हाल झाल्यास कायदेशीर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेच्या पैशातून सरकारी डॉक्टरांच्या शिक्षणाचा खर्च होतो. त्याच जनतेला तुम्ही मरणाच्या दारात सोडणार असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आता शेवटचे सांगतोय, हात जोडतो, कामावर परत या, शपथेला विसरु नका, देवाचा दर्जा दिलाय, दानव बनू नका, असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलक डॉक्टरांना दिला.

रुग्णांनी आणि सरकारने किती संयम दाखवायचा!

मुख्यमंत्री म्हणाले की, हात जोडले, पण तरीही डॉक्टरांची असंवेदनशीलता कायम आहे. डॉक्टरांसोबत शक्य ती सर्व चर्चा केली. विनंती केली, हात जोडले, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास राजीनामा देण्याची तयारी दाखवली, तरीही डॉक्टर सेवेत येत नसतील तर ती असंवेदनशीलता आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. शपथ विसरुन लोकांना मरणाच्या दारात सोडाल, तर तुम्हाला देवाऐवजी दानव म्हटले जाईल. रुग्णांचे हाल होत असताना नागरिकांचा जर संयम सुटला तर आम्ही काय करायचे? सरकारने आणखी किती संयम दाखवणे अपेक्षित आहे, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.

तर होणार कायदेशीर कारवाई
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सुरुवातीला सांगितले की, संघटनांशी चर्चा झाल्यानंतर इथं होय म्हणतात आणि बाहेर जाऊन आंदोलन करतात. आता डॉक्टरांनी एवढं ताणू नये. उच्च न्यायालय आणि सरकार दोघांचेही ऐकायला डॉक्टर तयार नाहीत. नाईलाजाने आता कडक कायदेशीर करण्याचा इशारा महाजन यांनी यावेळी दिला.