उस्मानाबाद । अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे माध्यान्ह भोजन न मिळाल्याने 14 दिवसात 100 मुलं दगावल्याचा आरोप केला जात आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाचे अध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी हा दावा केला आहे. सचिव विनित सिंघल यांच्यामुळे संप चिघळल्याचंही त्यांनी म्हटलं. मंत्र्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा दावाही देशमुखांनी केला आहे. उस्मानाबादमध्ये भगवानराव देशमुख यांनी ही माहिती दिली. अंगणवाडी कर्मचार्यांमध्ये सरकारच्या भूमिकेबद्दल तीव्र संताप आहे.
2 लाख कर्मचारी संपावर
महाराष्ट्रातल्या 2 लाख अंगणवाडी सेविका 14 दिवसांपासून संपावर आहेत. मानधनात वाढ आणि इतर सुविधांच्या मूलभूत मागण्या त्यांनी केल्या आहेत. मात्र सरकारनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे आता सरकारमध्ये बसून विरोधकांची भूमिका पार पाडणार्या उद्धव ठाकरेंना त्यांनी आंदोलनात येण्याची विनंती केली आहे. काजळा आणि सारोळा गावात अंगणवाडीत शिकणारी मुलं गावभर फिरत आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस घरकामात व्यस्त आहेत. सारोळ्यातली मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत येऊन बसतात. शिक्षक माणुसकी म्हणून मुलांना शिकवून खिचडीचा खाऊ देतात. अंगणवाड्या सरकारी अनास्थेचा बळी आहेत. जूनपासून अंगणवाड्यांमधील स्टेशनरी संपली आहे. पूरक आहार रजिस्टर, पूर्व प्राथमिक रजिस्टर, हजेरी पुस्तक, मासिक अहवाल पुस्तिका नाहीत. कर्मचार्यांना जूनपासून पगार नाही.