लोणावळा : अनाथ मुला-मुलींच्या पालकत्त्वाची जबाबदारी स्वीकारून त्यांचे संगोपन व शिक्षणाचे कार्य करणार्या भाजे येथील संपर्क बालग्राम संस्थेला शिवक्रांती एज्युकेशन सोसायटीच्या वतीने खुर्च्या भेट म्हणून देण्यात आल्या. शिवक्रांती सोसायटीने हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच, सोमवारी (दि. 10) आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात सामाजिक बांधिलकीतून या खुर्च्या संस्थेकडे सुपूर्द केल्या. शिवक्रांत एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रतीक पाळेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी सोमवारची रम्य सायंकाळ बालग्रामच्या मुलांसोबत घालवली. कार्यक्रमावेळी मुला-मुलींना खाऊ वाटप करण्यात आल्याने त्यांच्या चेहर्यावर विलक्षण आनंद होता.
120 मुला-मुलींचे संगोपन
भाजे गावातील संपर्क बालग्राम संस्थेमध्ये 120 अनाथ मुले-मुली असून, त्यांचे संगोपन व शिक्षणाचे कार्य संपर्क संस्था करत आहे. या संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, त्यांच्या पत्नी रत्ना बॅनर्जी व इतर मंडळी या मुलांचे स्वत:च्या पाल्यांप्रमाणे पालनपोषण करत आहेत. संपर्क संस्थेत काही कार्यक्रमाचे आयोजन केले असता, मुला-मुलींना बसण्यासाठी खुर्च्या नसल्याने त्यांना खाली जमिनीवर बसावे लागत होते. ही अडचण ओळखून प्रतीक पाळेकर व त्यांच्या सहकार्यांनी संस्थेला खुर्च्या देण्याचे ठरवले होते. त्यानंतर हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला त्या संस्थेकडे सुपूर्द करण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, शिवक्रांती कामगार संघटनेचे खजिनदार रवींद्र साठे, एज्युकेशन सोसायटीचे सदस्य महेश पवार, विशाल पाडाळे, विशाल विकारी, उल्हास भांगरे, प्रथमेश पाळेकर, सुमित मावकर, आकाश मावकर, प्रणव जाधव, खंडू बालगुडे, मिहीर कडू, आशिष मावकर, अनिकेत कुंभारे, निशांत गवळी, ज्ञानेश्वर बोर्हाडे आदी उपस्थित होते.
मुलांना स्वत:च्या पायावर उभे करू
अनाथ आश्रमात शिकणारी मुले-मुली 18 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना संस्थेत ठेवू नये, असा अध्यादेश शासनाने काढल्याने या संपर्क संस्थेत असलेल्या या मुलांचे पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे 18 वर्षानंतर या मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी शिवक्रांती एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांचे पुढील शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण, नोकरी आदींच्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी काय करता येईल, यावर पुढील काळात काम करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी शिवक्रांती कामगार संघटनेचे सचिव व शिवक्रांती एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक विजय पाळेकर यांनी दिले.