भुसावळ विभागाला लाखोंचा आर्थिक फटका
भुसावळ- पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील एस.टी.कर्मचार्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून अचानक संप पुकारल्याने सर्वत्र एस.टी.ची चाके थांबली आहेत. भुसावळ आगारात पहाटे चार वाजेच्या सुमारास संपाबाबत माहिती कळल्यानंतर एकही बस बाहेर गेली नाही. अचानक उद्भवलेल्या संपामुळे प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल होत असून खाजगी वाहतूकदारांची मात्र चांगलीच चांदी झाल्याचे चित्र होते.
भुसावळ आगाराचे चार लाखांचे नुकसान
भुसावळ आगारात 107 चालक व 121 वाहक असून 60 बसेसच्या माध्यमातून ते दिवसभरात 18 हजार किलेामीटर अंतर प्रवास करतात तर या माध्यमातून सरासरी चार लाखांचे उत्पन्न आगाराला मिळते मात्र शुक्रवारच्या संपामुळे तब्बल चार लाखांचा फटका आगाराला बसल्याचे आगारप्रमुख हरीष भोई म्हणाले. पहाटे चार वाजेच्या सुमारास भुसावळ आगाराची भुसावळ-धुळे ही बस जळगावपर्यंत गेली मात्र त्यानंतरही एकही बस गेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
पगार वाढीत परीवहन मंत्र्यांनी केला अन्याय
परीवहन मंत्र्यांनी एस.टी.कर्मचार्यांना पगार देण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक केल्याचा कर्मचार्यांचा आरोप आहे. यापूर्वी दरवर्षी होणारी वार्षिक वेतनवाढ तीन टक्क्यांवरून दोन टक्के करण्यात आली तर घरभाडे भत्ता 10 टक्क्यांवरून सात टक्के करण्यात आल्याने कर्मचारीवर्गात रोष आहे.