ठाणे । अंगणवाडी सेविका विविध मागण्यासंदर्भात राज्यव्यापी संपावर गेल्या असल्या तरीही पोषक आहाराअभावी विद्यार्थ्यार्ंची उपासमार होऊ नये याकरिता जिल्ह्यातील शिक्षक, आशा कार्यकर्ती, आणि गावकर्यांच्या मदतीने उद्या जिल्ह्यातील अंगणवाड्या चालू राहणार असून विद्यार्थ्यांना पोषक आहाराची उपलब्ध करण्यात येणार असल्याची ग्वाही बैठकी दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली.
सहकार्याचे आवाहन
आरोग्यसहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, प्राथमिक शाळा शिक्षक, ग्राम शिक्षण समितीच्या सहाय्याने व आहार शिजवणार्या बचत गटाच्या प्रतिनिधी, तसेच अंगणवाडी परिसरातील सुशिक्षित महिला यांनी अंगणवाड्या चालू राहण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी भीमनवार यांनी केले. तसेच लाभार्थी पोषक आहारापासून वंचित राहू नये यासाठी आवश्यक काळजी घेण्यात यावी याबाबत सूचनाही त्यांनी सबंधित विभागाला दिल्या.
प्रशासनाच्या सूचना
अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे लाभर्थाच्या पोषक आहारावर कोणताही परिमाण होऊ नये याची खबरदारी महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी सांगितले. याबाबत तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व मुख्य सेविकांना याबाबत अंगणवाड्या उघडल्या जातील आणि लाभार्थ्यांना आहार पुरवठा केला जाईल याची खातरजमा करण्याची सूचनाही केल्या आहेत.