अहमदनगर । मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याची भूमिका शेतकर्यांनी घेतली आहे. 5 जून रोजी मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्र बंद राहिल. 6 जूनला सर्व सरकारी कार्यालयाला कुलूप ठोकणार आणि 7 तारखेला आमदार-खासदारांच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार, असा इशारा शेतकर्यांनी दिला आहे. पुणतांबा येथे किसान कोअर कमिटीच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीसाठी बोलावले आहे. त्यामुळे आज रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी शेतकरी जाणार असल्याची माहितीही पदाधिकार्यांनी दिली.
राज्यभरातील शेतकरी संपावर
राज्यभरात 1 जूनपासून शेतकर्यांनी संपाची हाक दिली आहे. या काळात गावातून शहरात फळं, भाजीपाला, दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तूही पाठवणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकर्यांची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकर्यांनी संपावर गेले आहेत. तसेच पीक काढायचे नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचे नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकर्यांनी घेतला आहे.
दरम्यान, शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसेच शेतकर्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकर्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला होता. हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकर्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव दिला. त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली.