संभाजी ब्रिगेडमध्ये उभी फूट

0

मुंबई : निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी संभाजी ब्रिगेडने राजकिय पक्षाची घोषणा केली असली तरी निवडणुकीच्या आधिच संभाजी ब्रिगेडमधे महाराष्ट्राभर उभी फूट पडली आहे. संभाजी ब्रिगेडच्या महत्वाच्या पदांची धुरा अनेक वर्ष सांभाळणारे प्रा. प्रविण गायकवाड राज्यभरातील आपल्या कार्यकर्त्यांसह 12 जानेवारी रोजी पुण्यात शनीवारवाड्यावर होणार्‍या कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करणार आहेत. तशी माहिती त्यांनी स्वतः सोमवारी मुंबई मराठी पत्रकारसंघातील आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

स्वबळावर लढणार
दरम्यान, संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेड आगामी निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे जाहीर केले. रा. ग. गडकरी यांचा पुतळा हा विकृती दर्शविणारा असल्याने संभाजी ब्रिगेडच्या कामांचे कौतुक करत निवडणुका संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढविणार असून, मुंबईतील 227 जागांपैकी 170 जागांवर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पक्षाकडे पाठविले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळणार
प्रवीण गायकवाड यांच्या शेकापमध्ये प्रवेशानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळणार असल्याचा दावा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी यावेळी केला. शेतकरी कामगार पक्षाने यापूर्वी विरोधी पक्षाची भूमिका योग्य रित्या पार पडली आहे व हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. शेतकर्‍यांच्या व कामगारांच्या प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष कटीबध्द आहे. शेकापमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावर गेली कित्येक दिवस विचार विनमय व चर्चा सुरु होती. सर्व दृष्टीकोनातून विचार केल्यानंतर येत्या 12 जानेवारी रोजी पक्ष प्रवेश करणार असल्याचे नक्की केल्याचे प्रवीण गायकवाड यांनी यावेळी सांगितले. पक्ष प्रवेशाच्या वेळी आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

शेकापच भूमिका पार पडेल
प्रवीण गायकवाड यांचा शेकापमध्ये प्रवेश झाल्यावर पक्षाला सुद्धा नवीन जोमाचा नेता मिळणार आहे. त्यांना पक्ष महत्वाची जबाबदारी देवून त्यांच्या सोबत आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुद्धा सन्मानाचे स्थान देणार असून पुढील काळात काँग्रेस व राष्ट्रवादी ऐवजी शेतकरी कामगार पक्ष विरोधी पक्षाची भूमिका पार पडेल असा विश्वास असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची सुद्धा आग्रही मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.