पुणे । काही वर्षापूर्वी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लालमहालातून हटविण्यात आला होता. तो पुतळा लवकरच बसविला जाईल असे आश्वासन महापालिकेने दिले होते. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही. या घटनेची आठवण करून देण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने पुण्यतिथीच्या निमित्ताने मंगळवारी सकाळी पुणे महापालिकेच्या आवारात दादोजी कोंडदेव यांचा फोटो लावून त्याचे पूजन केले. हे समजताच पालिका आवारात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली व घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच दादोजी कोंडदेव यांचा फोटो तत्काळ हटवावा अशी मागणी केली. यावरून संभाजी ब्रिगेड व ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांत चांगलीच वादावादी झाली.
अखेर काही वेळांनी अखिल भारतीय महासंघाचे पुणे शहराध्यक्ष आनंद दवे यांनी कोंडदेव यांची प्रतिमा काढून घेतली. आम्ही केवळ प्रतिकात्मक पद्धतीने दादोजी कोंडदेव यांची प्रतिमा बसवून प्रशासनाला आठवण करून देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे दवे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता पुढील अनर्थ टळला. सात-आठ वर्षापूर्वी पुण्यातील लाल महालात शिवाजी महाराजांच्या सोबत असलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढण्यात आला होता. याला ब्राह्मण समाजासह महासंघाचा विरोध होता. यावरून तेव्हा बरेच राजकारण झाले होते. मात्र, त्यावेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने हात वर करत हा पुतळा अभ्यास समितीच्या निष्कर्षावरून काढण्यात आल्याचे म्हटले होते. तसेच दादोजी कोंडदेव यांचा पुतळा नंतर बसविला जाईल असे म्हटले होते.
पुतळा नेमका बसवायचा तरी कुठे?
राष्ट्रवादीनंतर पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आली तरी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा अद्याप बसविलेला नाही त्यामुळे ब्राह्मण महासंघात नाराजी होती. मात्र, दादोजी कोंडदेव यांचा पुतळा कुठे बसवावा याबाबत प्रश्नचिन्ह आहेत. तो लाल महालात असावा की नसावा याबाबत ब्राह्मण महासंघानेही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यामुळे कोंडदेव यांचा पुतळा नेमका बसवायचा तरी कुठे असा प्रश्न प्रशासनासह सत्ताधारी भाजपला पडला आहे. महापालिकेकडून कोंडदेव यांचा पुतळा बसविण्यास विलंब होत असल्याने या घटनेचा निषेध म्हणून आज ब्राह्मण महासंघाने थेट महापालिकेच्या आवारातच कोंडदेव यांचा फोटो लावून पुण्यतिथीनिमित्त पूजन केले. मात्र, संभाजी ब्रिगेडने त्याला आक्षेप घेतल्याने तासाभरात ही प्रतिमा ब्राह्मण महासंघाला काढून घ्यावी लागली आहे.