पुणे : पालखीमार्गात अडथळा उत्पन्न करून धुडगूस घातल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरवर्षी भिडेसमर्थक अशा प्रकारे गोंधळ घालून पालखीत विघ्न आणत असतात. काल सायंकाळच्या सुमारास गुडलक चौक ते संभाजी महाराज पुतळा या मार्गादरम्यान तलवारी नाचवत व घोषणाबाजी करत, त्यांनी गोंधळ घातल्याने काहीकाळ माऊलींची पालखी थांबविण्यात आली होती. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ती मार्गी लागली होती. या घटनेने पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, पोलिसांनी संभाजी भिडे यांच्यासह संजय जठार, पारशर मोने, रावसाहेब देसाई, अविनाश मरकळे यांच्यासह सुमारे हजार जणांवर गुन्हे दाखल केले असून, त्यांच्याविरुद्ध अटकसत्र सुरु केले होते. तलवारी नाचविल्याचा आरोप मात्र भिडेसमर्थकांनी फेटाळला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कदम यांनी सरकार पक्षातर्फे तक्रार दाखल केलेली आहे.
घोषणाबाजीमुळे गोंधळ अन् तणाव
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगत्गुरु तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे रविवारी शहरात सायंकाळी आगमन झाले. दरम्यान, या पालख्या संगमपूल येथून फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर येउन तेथून विशिष्ट क्रमाने मुक्कामी स्थळावर मार्गस्थ होतात. प्रथम संत तुकाराम, त्यानंतर संत गब्बर शेख, संताजी महाराज जगनाडे आणि संत ज्ञानेश्वर पालखी असा हा क्रम असतो. या पालख्या फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौकात आल्यानंतर भिडे यांच्या संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी पालखी मार्गात घुसून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या परिसरात एकच गोंधळ उडाला. मोठमोठ्याने घोषणा देत असतानाच काही कार्यकर्त्यांच्या हातात तलवारी असल्याने या गोंधळात आणखी भर पडली व तणाव निर्माण झाला.
पालखीप्रमुखांच्या तक्रारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
ज्ञानेश्वर महाराज पालखीप्रमुखांनी सतत होणार्या या प्रकारामुळे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गुडलक चौकातच थांबवली. डेक्कन पोलिस तसेच वरिष्ठ अधिकार्यांनी तात्काळ याठिकाणी धाव घेतल्याने गोंधळ काही प्रमाणात कमी झाला. मात्र, पालखीप्रमुखांनी हा प्रकार बंद झाल्याशिवाय पालखी मार्गस्थ होणार नाही, असा प्रवित्रा घेतल्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. दरम्यान, याठिकाणी पालख्या आल्यानंतर असा प्रकार होत असल्याचे पोलिसांना पालखीप्रमुखांकडून सांगण्यात आले होते. तरीही पोलिसांकडून कोणतीच खबरदारी घेण्यात आली नाही. त्यामुळे हे प्रकार बंद झाल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही. तसेच, पोलिसांना हे थांबवता येत नसेल, तर आम्ही पालखीचा मार्ग बदलू, असेही यावेळी पोलिसांना सांगण्यात आले. त्यानंतर परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त बसवराज तेली यांनी पालखीप्रमुखांना यापुढे असा प्रकार होणार नाही याची हमी देतो, तसेच तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करु, असे आश्वासन दिले. त्यानंतर पालखीे मार्गस्थ झाली. यासर्व गोंधळात तब्बल अर्धातास पालखी गुडलक चौकात थांबली होती. त्यानंतर डेक्कन पोलिसांकडून याप्रकरणी संभाजी भिडे गुरुजी व त्यांच्या एक हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
म्हणे, आम्ही केवळ दर्शनासाठी वारीत!
माऊलींचा पालखी सोहळा रविवारी सायंकाळी फर्ग्युसन रस्त्यावर आल्यानंतर शिवप्रतिष्ठान संघटनेच्या कार्यकत्यांनी मिरवणुकीत विनापरवाना सहभाग घेतला. त्यामुळे पालखी मिरवणूक 10 ते 15 मिनिटे थांबून राहिली. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती परिमंडल एकचे पोलिस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिली. भिडे गुरुजींच्या कार्यकर्त्यांकडून असा प्रकार नेहमी होत असल्याने वारकर्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी वारकर्यांची समजूत घातली व असा प्रकार आता यापुढे होणार नाही, असे लेखी हमीपत्र पोलिसांनी ज्ञानोबा माऊली पालखी प्रशासनाला दिल्याने यावर पडदा पडला. दुसरीकडे, आम्ही केवळ ज्ञानोबा, तुकोबांच्या दर्शनासाठी या वारीत सहभागी होत असतो. आमच्या कार्यकर्त्यांनी वारीत कोणताही गोंधळ केला नाही किंवा कोणत्याही तलवारीही त्या ठिकाणी नेल्या नाहीत, असे स्पष्टीकरण श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांनी दिले आहे.