नवी दिल्ली । कोरेगाव भीमाच्या जातीय दंगली मागे हात असलेल्या शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांचे नाव महाराष्ट्र सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी सुचवले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2016 मध्ये 10 मंत्र्यांच्या एका समितीने पद्मश्री पुरस्कारासाठी संभाजी भिडे यांचे नाव सुचवले होते. संभाजी भिडे गुरुजी यांनी यासाठी अर्ज केला नव्हता. तरीही संभाजी भिडे गुरुजी यांचे नाव या मंत्र्यांच्या समितीने सुचवले होते असे समजते आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे.
शेण आणि कचर्याला उत्पन्नाचे स्त्रोत बनवा
1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमा या ठिकाणी जो हिंसाचार उसळला त्यामागे भिडे गुरुजींचा हात होता असे म्हटले जाते तसेच मिलिंद एकबोटेंचाही हात होता असेही म्हटले जाते आहे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण व्हावी यासाठी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोघांनी चिथावणी दिली होती, अशीही माहिती समोर येते आहे. या दोघांवर गुन्हेही दाखल आहेत. अशात भाजपच्या मंत्र्यांनीच त्यांची शिफारस केली होती, अशी माहिती समोर आली आहे.
यापूर्वीही अटकेची मागणी
2008 मध्ये संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संस्थेने ‘जोधा अकबर’ या सिनेमाला कडाडून विरोध केला होता तसेच मीरज-सांगली या ठिकाणी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज अफझल खानाचा कोथळा काढत आहेत, असे पोस्टर लावण्यात आले होते. यावरून वाद झाला होता आणि त्यावेळी आघाडी सरकारकडे त्यांच्या अटकेची मागणी झाली होती.
याआधीही घटनांमध्ये हात
संभाजी भिडे हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे. त्यांच्या आयुष्यातील काही काळ ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते, तर 1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या हिंसाचारामागे भिडे गुरुजींचा हात होता, असा आरोप होतो आहे. याआधीही अशाच काही घटनांमध्ये त्यांचे नाव समोर आले आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.