चाळीसगाव- शहरातील संभाजी सेनेमार्फत दर महिन्याच्या 19 तारखेला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या महाआरतीचे आयोजन केले जाते. 19 नोव्हेंबर रोजी ही या उपक्रमातील तिसरी महारती होती. यावेळी शहरातील शिवप्रेमी नागरिक संभाजी सैनिक तसेच सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी पाचोरा येथील माजी आमदार तथा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख आर.ओ.पाटील यांची विशेष उपस्थिती होती. चाळीसगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा ही गेल्या अनेक वर्षापासूनची चाळीसगाव करांची मागणी आहे. त्या दृष्टिकोनातून चाळीसगाव नगरपालिकेने आता सकारात्मक पावले उचलली असून पुतळ्याचे उभारणीसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून गेल्या चार दिवसापूर्वी एका समितीने पुतळ्याच्या जागेच्या पाहणी करून मोजमाप केल्याचे सांगितले आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रत्यक्षात अस्तित्वात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असे संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बापू शिरसाट यांनी सांगितले. आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नातून येणार्या काळात शिवसृष्टी सह शिवाजी महाराजांचा पुतळा याठिकाणी होईल, असे उमंग संस्थेचे अध्यक्षा संपदा पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले आहे. आर.ओ.पाटील यांनी शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा यासाठी आग्रही राहण्याची भूमिका मांडली असून संभाजी सेनेच्या आंदोलनाचे कौतुक केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्राला कायम स्वरूपी मिळत राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संभाजी सेना सह्याद्री प्रतिष्ठान पप्पूदादा गुंजाळ प्रतिष्ठान तसेच शहरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. लक्ष्मण बापू शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले.