संभाप्पा नगरात एकावर प्राणघातक हल्ला

0

धुळे । शहरातील मील परिसरात असलेल्या चितोड रोड लगतच्या संभाप्पा कॉलनीत काल मध्यरात्री मारेकर्‍यांनी थरार केला. मिलींद चौधरी यांचे केवळ घरच जाळण्याचा प्रयत्न झाला नाही तर त्यांच्यावर प्राणघातक हल्लाही करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झालेल्या मिलींद चौधरी यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, कुणीही तक्रार करण्यास आले नाही म्हणून घटनेची नोंद झाली नसल्याचे शहर पोलिसांकडून
सांगण्यात आले.

चौधरी यांच्या पत्नी मुलांसह बाहेरगावी
काल मध्यरात्री 12 नंतर संभाप्पा कॉलनीत रहाणार्‍या मिलींद चौधरी यांच्या घराजवळ आलेल्या काही लोकांनी घराबाहेर लावलेल्या मोटारसायकलला पेटवून दिले. तसेच हातातील टिक्कमने लाकडी खिडकीसह दरवाजा तोडून घरात प्रवेश करीत घरातील सामानही इतस्ततः फेकले. यावेळी मिलींद चौधरी यांच्या पत्नी मुलांसह बाहेरगावी गेलेल्या असल्याने ते एकटेच घरी होते. आलेल्या हल्लेखोरांपैकी एकाने त्यांच्यावर घातक शस्त्राने वार केला. तर इतरांनी घर जाळण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांच्या मारहाणीत तसेच शस्त्राचा वार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या मिलींद चौधरी यांना उपचारार्थ शहरातील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने संभाप्पा कॉलनीसह लगतच्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले.