पुणे : डेक्कन क्वीन एक्स्प्रेसने पुण्यातून दररोज शेकडो प्रवासी मुंबईत कामानिमित्त प्रवास करत असतात. पुणे स्थानकात ही गाडी नेहमी फलाट क्रमांक एकवरून सुटत होती. मात्र, मागील सहा महिन्यांपासून ती फलाट क्रमांक पाचवरून सोडली जात असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. तक्रार करूनही रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने सोमवारी सकाळी डेक्कन क्वीनच्या प्रवाशांनी गाडी पाऊणतास रोखून धरत आंदोलन केले.
रेल्वेचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष, ठरवून केले आंदोलन
डेक्कन क्वीन एक्स्प्रेसने दररोज शेकडो चाकरमानी मुंबई व परिसरात नोकरी व उद्योग, व्यवसायाच्यानिमित्ताने जात असतात. वर्षानुवर्षे नियमित पुणे-मुंबई व मुंबई-पुणे असा प्रवास करणारे हजारो पासधारक प्रवासी या गाडीतून प्रवास करतात. पुणे स्थानकातून नेहमी फलाट क्रमांक 1 वरून सुटणारी डेक्कन क्वीन गेल्या सहा महिन्यांपासून फलाट क्रमांक 5 वरून सुटत आहे. प्रवाशांना याचा त्रास होत असल्याने वारंवार तक्रारदेखील केली. परंतु, रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत होते. सोमवारी सकाळी या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. प्रवाशांनी डेक्कन क्वीन रोखून धरत संताप व्यक्त केला. यामुळे दररोज सकाळी 7.15 वाजता निघणारी डेक्कन क्वीन सोमवारी 8 च्या सुमारास रवाना झाली. रेल्वे प्रशासनाने सहा महिन्यांपासून फलाटाबाबतच्या मागणीची दखल न घेतल्याने या गाडीतून दररोज प्रवास करणार्या प्रवाशांनी सोमवारी सकाळी ठरवून हे आंदोलन केले.