नवी दिल्ली – कोरोना विरुध्दच्या लढाईत भारत स्वत:च्या देशात लढत असताना इतर देशांनाही मदत करत आहे. अशा शब्दात संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांनी भारताचे कौतुक केले आहे.
करोनाशी लढा देण्यासाठी सर्व जगात एकता निर्माण झाली पाहिजे अशी भावना संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांनी व्यक्त केली आहे. याचा अर्थ प्रत्येक देश जो मदत करण्यास समर्थ आहे त्याने इतर देशांना मदत केली पाहिजे. जे अशी मदत करत आहेत त्यांना आमचा सलाम आहे, असे अँटोनियो ग्युटेरेस यांनी म्हटले असल्याची माहिती त्यांचे प्रवक्ते स्टीफन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. भारत इतर देशांना औषधांचा पुरवठा तसेच इतर मदत पुरवत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले.
५५ देशांना औषधपुरवठा
करोनाशी लढा देण्यासाठी इतर देशांमधून वाढती मागणी लक्षात घेता भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. केंद्र सरकारने ५५ देशांना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, नेपाळ, मलादिव, श्रीलंका, म्यानमार, ओमान, संयुक्त अरब अमिराती, सेशेल्स, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, डॉमनिकन रिपब्लिक, युगांडा, इजिप्त, सेनेगल, अल्जेरिया, जमैका, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, युक्रेन, नेदरलँड, स्लोवानिया, उरुग्वे, इक्वाडोर आणि अन्य देशांचा समावेश आहे.