संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कोरोनावर चर्चा करण्यास चीनचा नकार

0

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसबाबत चीनला एक ना एक दिवस जगाला माहिती द्यावीच लागेल. आपण एका वैश्विक जगात राहत आहे. जागतिक समस्येवर महत्त्वपूर्ण सूचना आणि पर्यायांवर एकमेकांशी चर्चा करणे गरजेचे आहे अशा शब्दात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे सैय्यद अकबरुद्दीन यांनी चीनला खडे बोल सुनावले आहे.

यापूर्वी आलेल्या रिपोर्टनुसार चीनने संयुक्त राष्ट्र परिषदेत वुहान आणि कोरोनाबाबत चर्चा करण्यासाठी नकार दिला आहे. मार्च महिन्यात चीनकडे १५ सदस्यीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद होते. यावर सैय्यद अकबरुद्दीन म्हणाले की, सुरक्षा परिषदकडे अजेंडा असतो. आतापर्यंत हा मुद्दा पटलावर न आल्याने यावर कोणतीही कमेंट करु शकत नाही. ही अनौपचारिक चर्चा आहे, आज नाहीतर उद्या यावर चर्चा होईल असे ते म्हणाले.

सय्यद अकबरुद्दीन म्हणाले की कोरोना विषाणू नावाच्या या साथीला जर समजावून घ्यायचे असेल तर आपण पारदर्शक, वैज्ञानिक पद्धतीने आणि मोकळेपणाने हा प्रश्न समजून घ्यावा लागेल. एक वेळ येईल जेव्हा आपण या संकटावर मात करू, आता आपल्या अस्तित्वाला आव्हान देणार्‍या या आजाराशी लढा देण्याची गरज आहे. दरम्यान, कोणालाही दोष देण्याची ही वेळ नाही, परंतु तरीही सर्वांनी एकत्र उभे राहून मानवी अस्तित्वाला आव्हान देणार्‍या महामारीविरोधात लढण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.