संरक्षक भिंत अभावी कळंत्री शाळेची सुरक्षा धोक्यात

0

चेअरमन डॉ.सुनील राजपुत यांनी वार्षिक सभेत मांडली कैफियत
पंधराशे विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर

चाळीसगाव – तीन तालुक्याच्या सीमेवरील विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शहरातल्या नावाजलेल्या चंपाबाई कलंत्री प्राथमिक शाळेचे दोन एकरात क्रीडांगण आहे. या शाळेला संरक्षण भिंत नसल्याने येथे मोकाट कुत्रे तसेच जनावरांचा उपद्रव वाढला आहे. सुमारे १५०० विद्यार्थ्याचा सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही बाब नुकत्याच झालेल्या चाळीसगाव एज्यूकेशन सोसायटीच्या सभेत गांभीर्याने चेअरमन यांनी मांडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

संस्थेकडून सापत्न वागणूक ?
चाळीसगाव एजूकेशन सोसायटीचे शहरात विविध शाखा आहेत. मात्र २००४ पासून जयहिंद कॉलनी परिसरात असलेली ही शाळा व्यवस्थापन समिती तसेच दानशूर व्यक्तीपासून दुर्लक्षित राहिली आहे. त्यामुळे ही शाळा भव्य क्रीडांगण असून येथील विद्यार्थी संरक्षण भिंत अभावी मोकाट जनावरांचे लक्ष बनले आहेत. आजूबाजूला झाडेझुडपे वाढल्याने येथे सांडपाण्याचे बारमाही डबके साचले आहे, तसेच डुकरांचा उपद्रव वाढल्याने मुलांकडून हवा तेवढा क्रीडांगणाचा वापर होत नाही. येथे सरस्वती आवटे बालक मंदिर असल्याने लहान मुलांना खेळापासून वंचित राहावे लागते. या परिसराला संरक्षक भिंत बांधली तर या शाळेच्या वैभवात भर पडणार आहे. पालकांनी देखील अनेक वर्षांपासून संचालक मंडळाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याबाबत आजतागायत उदासीनता दिसून येते आहे. संस्थेकडून सापत्न वागणूक मिळते की काय म्हणून या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, अशी ओरड पालकांमध्ये दिसून येत आहे.

चेअरमन यांच्या आवाहनाने खळबळ !
संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन डॉ.सुनील राजपुत यांनी संरक्षण भिंतीचा मुद्दा ही बाब जाहीर मांडल्याने खळबळ उडाली. ही शाळा दर्शनी भागात नसल्याने समस्येकडे अनेकांचे लक्ष नाही. मात्र माझ्या वैयक्तिक प्रयत्नातून हे प्रयत्न अपुरे पडत असल्याने काही दानशूर मंडळीनी पुढे यावे जेणेकरुन भावी पिढीचे नागरिक घडविताना त्यांचा सर्वांगीण विकास करता येईल, अशी अपेक्षा चेअरमन डॉ.सुनील राजपुत यांनी जनशक्तिशी बोलताना व्यक्त केली.