संरक्षण दलाला साडेपाच हजार कोटींच्या खरेदीची मान्यता

0

नवी दिल्ली – संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांच्या अध्यक्षतेखाली डिफेन्स अॅक्वेझिशन कौन्सिलने (डिएसी) सुरक्षा दलाच्या ५ हजार ५०० कोटींच्या उपकरण खरेदीसाठी मान्यता दिली. संरक्षण उपकरणाच्या क्षेत्रामध्ये स्वदेशीकरण आणि आत्मनिर्भरतेचे ध्येय साध्य करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

रडारांच्या खरेदीसाठी मान्यता

डिएसीने सुरक्षा दलांना भारतीय हवाई दलासाठी १२ उच्च क्षमता असलेल्या रडारांच्या खरेदीसाठी मान्यता दिली. त्यामुळे उच्च गतीशील लक्ष्याला शोधण्यात सुरक्षा दलाच्या क्षमतेत वाढ होईल. हे रडार अँटेनाच्या कोणत्याही यांत्रिक हालचालींशिवाय देखील ३६० अंशामध्ये शोधकार्य करू शकतात. तसेच खूप कमी देखभालीत ते दिवसातील २४ तास आणि आठवड्यातील ७ दिवस चालण्यास ते सक्षम आहेत.

यासोबतच डिएसीने भारतीय तटरक्षक दल व भारतीय सैन्याला देखील एअर कुशन व्हेईकल खरेदीसाठी मान्यता दिली आहे. या जहाजांमुळे पारंपारिक नौकांच्या तुलनेत उथळ पाणी आणि दलदली सारख्या परिस्थितीत देखील उच्च वेगाने प्रवास करणे शक्य होईल. यामुळे सुरक्षा दलांच्या क्षमतेत वाढ होणार असून प्रतिकुल परिस्थितीत देखील काम करणे सोपे होणार आहे.