संवाद ऐकून घ्यायचा नसेल तर चालते व्हा

0

पैठण । आघाडी सरकारने तुम्हाला काय देले? आमचे सरकार तरी देत आहे. आमचा संवाद ऐकून घ्यायचा नसेल तर चालते व्हा, अशा अर्वाच्च भाषेत आमदार अतुल सावे हे सवाल विचारणार्‍या शेतकर्‍यांवर खेकासले. पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे शिवार संवाद बैठकीदरम्यान हा प्रकार घडला. या प्रकाराच्या व्हिडिओ समोर आला आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकारून शेतमालाला हमी भाव द्यावा, ठिबक सिंचनासाठी 75 टक्के अनुदान देण्यात यावे, शेततळ्यासाठीचे अनुदान 50 हजारावरून किमान 75 हजार रुपये करावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी तेथे केली.

कर्जमाफीचा जास्त फायदा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना
आमदार अतुल सावे शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली तर सर्वात जास्त फायदा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचाच होईल. 33 हजार कोटींपैकी एकट्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांवर 28 हजार कोटींचे कर्ज आहे. तर मराठवाड्यातील शेतकर्‍यांवर पाच हजार कोटींचे कर्ज आहे, असे आमदार अतुल सावे यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार भाऊ थोरात, महाराष्ट्र महिला आघाडीच्या उपाध्यक्षा रेखा कुलकर्णी, भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, कांताराव औटे, लक्ष्मण औटे, दिलीप थोरात, शिवाजी कानडे, विष्णू पठाडे, तालुका उपाध्यक्ष सचिन काळे आदींची उपस्थिती होती.

शेतकर्‍यांना 49 हजार विहिरी मंजूर
सावे पुढे म्हणाले, अडीच वर्षांत शेतकर्‍यांना 49 हजार विहिरी मंजूर करण्यात आल्या असून जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. केंद्र राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळातील सर्वसामान्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन आमदार सावे यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.