संविधानाचा मान राखला पाहिजे – डॉ.सबनीस

0

कष्टकरी साहित्य संमेलनात केले मार्गदर्शन

आकुर्डी : श्रमिकांना किमान वेतन, निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाहनिधी मिळणे ही मार्क्सवादाची देणगी आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखून न्याय-हक्कासाठी लढले पाहिजे. संविधानाचा मान राखला गेला पाहिजे. सरकार व समाजाचे लक्ष वेधून घेण्यासाठी असंघटित कामगार व कष्टकर्‍यांचे साहित्य संमेलन महत्त्वाचे आहे. कष्टातून साहित्य फुलत असते. कामगारांना सुट्या, योग्य वेतन मिळाले पाहिजे. त्यासाठी असंघटित कामगारांसाठी लढा उभारावा लागेल. त्यासाठी मार्क्सवादाने हिंसा सांगितलेली नाही. अन्यायाविरुद्ध लढण्याचा हक्क सर्वांना असला, तरी त्यासाठी हिंसा करणे योग्य नाही. न्याय मागण्यासाठी अहिंसक मार्गाने संघर्ष करायला पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

कष्टकरी संघर्ष महासंघ आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्यातर्फे रविवारी श्रमशक्ती भवनात असंघटित कष्टकरी साहित्य संमेलन पार पडले. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.सबनीस बोलत होते. अध्यक्षस्थानी कवी तुकाराम धांडे होते. राष्ट्रीय हॉकर्स फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव शक्तिमान घोष, मानवी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, ज्येष्ठ कामगार नेते माधव रोहम, नितीन पवार, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष व स्वागताध्यक्ष काशिनाथ नखाते, संमेलनाचे निमंत्रक पुरुषोत्तम सदाफुले आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ कामगार नेते विनायक चक्रे यांना पुरस्कार

उद्घाटनापूर्वी श्रमिकांनी शहीद कामगारांना अभिवादन करून दिंडी काढली. त्यात कष्टकरी महिला बाबूंच्या टोपल्या घेऊन सहभागी झाल्या होत्या. बंजारा महिलांनी पारंपरिक बंजारा नृत्य केले. संमेलनानिमित्त काढलेल्या ‘श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकर्‍यांची आमची वस्ती’ या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. विजेचा धक्का लागून अपंगत्व येऊन ताठ मानेने जीवन जगणारे बांधकाम मजूर कालिपद सरकार यांचा गौरव केला. ज्येष्ठ कामगार नेते विनायक चक्रे यांना नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कार देऊन सन्मानित केले.