संविधानाची अंमलबजावणी न होणे हेच भारतापुढील सर्वात मोठे आव्हान

0

पिंपरी-चिंचवड : ‘मानवाच्या शाश्‍वत विकासासाठी संविधानातील अंतर्भूत चौवीस पैकी फक्त सात प्रयोजनांचा स्विकार भारत सरकारने केला आहे. संविधानातील तरतुदींची अंमलबजावणी न होणे हेच मोठे आव्हान आहे’, असे मत ज्येष्ठ विचारवंत व प्रा. पी. आर. सोनवणे यांनी रविवारी येथे केले. भारतीय संविधान जनजागृती समिती पिंपरी-चिंचवड शहराच्यावतीने आयोजित संविधान सन्मान कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे होते.

सर्वधर्मियांतर्फे पिंपरीत रॅली
भारताच्या 69 व्या संविधान दिनानिमित्त सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन आज पिंपरी येथे भव्य रॅली काढली. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा (मोरवाडी चौक), महात्मा फुले पुतळा, एच. ए. कॉलनीतील छ. शिवाजी महाराज पुतळा या मार्गे या रॅलीचा समारोप डॉ. आंबेडकर पुतळा येथे करण्यात आला. या प्रसंगी शालेय मुलींकडून प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन झाले.

मताधिकारी जागृतीची गरज
सोनवणे म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी विकासासाठी 17 कार्यक्रम निश्‍चित केले आहेत. बाबासाहेबांनी घटनेमध्ये 24 प्रयोजनांचा समावेश केला आहे. मात्र भारत सरकारने अवघे 7 कार्याक्रम स्विकारले असून येणार्‍या काळात 10 स्विकारणार आहेत. परंतु उरलेल्या 14 सांविधानिक मानवी विकास कार्यक्रमांचे काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. यासाठी जनतेने एकत्रित येऊन मताधिकार जागृती अभियान सुरू करण्याबरोबरच जनप्रतिनिधी म्हणून निवडून द्यावयाच्या लोकांचे प्रशिक्षण अभियान सुरू करण्याची तातडीने गरज आहे. भारतीय जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवून प्रारंभ बिंदू निश्‍चित करण्याची गरज आहे.

विविध संघटना, मंडळे, संस्थांचा सहभाग
या कार्यक्रमामध्ये भारतीय संविधान दिन सोहळा समिती, मराठा सेवा संघ-पिंपरी चिंचवड शहर, संकल्प पुष्पमाला समिती पिंपरी, संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, स्वराज्य अभियान महाराष्ट्र, पद्मयानी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी-चिंचवड, बौद्ध समाज विकास महासंघ, अशोक सर्वांगीण विकास सोसायटी, वही-पेन संकलन समिती, पंचशील बुद्ध विहार थेरगाव, जमात ए इस्लामिक हिंद पिंपरी-चिंचवड, शाक्यमुनी चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सम्यक विद्यार्थी आंदोलन, भारिप बहुजन महासंघ, धम्मचक्र बुद्ध विहार शाहूनगर, नागवंशी संघ पुणे, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, इंद्रायणीनगर बुद्धविहार, आरपीआय पिंपरी-चिंचवड, स्व. दत्तोपंत म्हसकर संस्था एच.ए. एस.सी. – एस.टी. युनियन, बौद्धजन मंडळ, एच. ए. कॉलनी, एच. ए. ओबीसी संघ, एच. ए. कामगार पतपेढी, पिंपरी गुरुद्वारा समिती, सिंधी पंचायत समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवामंच निगडी, विश्‍वशांती बुद्धविहार दळवीनगर, निगडी आदी संघटना, मंडळे व संस्था सहभागी झाल्या होत्या.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी महापौर नितीन काळजे, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, सुलक्षणा धर, बाळासाहेब त्रिभुवन, निकिता कदम, मा. महापौर वैशाली घोडेकर, चंद्रकांता सोनकांबळे, प्रशासकीय अधिकारी रविंद्र दुधेकर, शरद जाधव यांच्यासह शंकडो सर्वधर्मीय नागरिक व विविध संस्था संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमंत्रक विष्णू मांजरे यांनी केले. आभार मानव कांबळे यांनी मानले.