नंदुरबार / शहादा । येथील पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यात 68व्या भारतीय संविधान दिन व 26/11 मुंबई दहशतवाद हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संविधान दिनानिमित्त पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना संविधान दिनाची शपथ पोलीस मुख्यालयात दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याचबरोबर 26/11च्या मुंबई येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यातील सर्व शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी श्रध्दांजली वाहिली.
राज्यघटनेमुळे सर्वांना समान न्याय, हक्क प्रदान
शहादा । मुलभूत हक्कांसह अभिव्यक्तीचे स्वांतत्र्य भारतीय संविधात नमूद केल्यानेच आपण मनातील विचार जाहीरपणे प्रकट करू शकतो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून सर्वांन समान न्याय व हक्क प्रदान करणारी राज्यघटना तयार केल्यानेच त्यांना घटनेचे शिल्पकार म्हणून गौरविण्यात येत असे प्रतिपादन विधी महाविद्यालयाचे प्रा. राजेश मकासरे यांनी केले. येथील राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने संविधान गौरव दिनानिमित्त आयोजित गुणगौरव व व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. तहसील कार्यालयाजवळ असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकस्थळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सातुपडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील होते. याप्रसंगी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, नायब तहसिलदार डॉ. उल्हास देवरे, सपोनि सुभाष जाधव, सामाजिक कार्यकर्ता डॉ. कांतीलाल टाटिया, प्रा. एल.एस. सैय्यद, प्रा. देवेंद्र निकम, शहादा पंसचे माजी उपसभापती बापू जगदेव, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, पालिका शिक्षण सभापती उषाबाई कुवर, रिपाईचे तालुकाध्यक्ष अनिल कुवर, फुले आंबेडकर स्टडी सर्कलचे चुनिलाल ब्राह्मणे आदींची उपस्थिती होती.
26 पोलीसांचे रक्तदान
पोलीस मुख्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे 26 पोलीस कर्मचार्यांनी रक्तदान करून 26/11 हल्ल्यातील जवानांना श्रध्दांजली वाहिली. तसेच पुढील आठवड्यात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी यांच्या करीता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी जाहीर केले. याप्रसंगी उप विभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, पोलीस निरीक्षक संजय मथुरे, सुभाष भोये, संजय महाजन, संदिप रणदिवे, राखीव पोलीस निरीक्षक अरमान तडवी यांच्यासह अन्य दुय्यम अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथे संविधान दिन व 26/11 हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली.
संविधान पुस्तिकेचे वाचन
प्रारंभी भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले. याप्रसंगी संविधान पुस्तिकेचे पूजन व प्रास्तविकेचे वाचन करण्यात आले. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील व डॉ. कांतीलाल टाटिया यांनी मनोगत व्यक्त केले. शैक्षणिक, उद्योग, व्यवसाय, कला, क्रीडा, कला क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आली. सुत्रसंचालन किरण मोहिते व नरेंद्र महिरे यांनी केले. प्रास्तविक प्रा. राजेंद्र निकुंबे यांनी केले. आभार सुरेश बिर्हाडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुरेंद्र कुवर, मुनेशचंद्र जगदेव, सुनील गायकवाड, चिकु मोघे, दिलीप जगदेव, शशिकांत कुवर, डॉ. अशोक कुवर, नरेंद्र कुवर, पप्पु पाटोळे, रतीलाल सामुद्रे, महेंद्र कुवर, जितेंद्र कुवर, राजू अहिरे, एकनाथ कुवर आदींनी सहकार्य केले.
महापुरूषांना डोक्यात घेणे गरजेचे
प्रा. मकासरे यांनी भारतीय संविधान, प्रास्तविका व राज्यघटनेतील तरतूद, कलमे, परिशिष्टांची माहिती दिली. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेबांच्या कार्यांवर बोलणारे लाखो वक्ते आहेत, लेखन करणारे लेखक व ग्रंथही भरपूर आहेत. मात्र, बाबासाहेब समजवून सांगणार्यांची संख्या कमी आहे. महापुरूषांना डोक्यावर घेवून नाचण्यापेक्षा त्यांना डोक्यात घेणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आरक्षण नव्हे, प्रतिनिधीत्वाचा उल्लेख केला आहे. भारतीय संविधान जनतेचे असल्याने प्रास्तविकेत ‘आम्ही लोक‘ असा उल्लेख करण्यात आला आहे. संविधानानुसार देशातील ‘आपण‘ सर्व नागरिक हे लाभार्थी नसून हक्कार्थी आहोत. सरकारचे लाभार्थी विजय मल्या(किंग फिशर) व मुकेश अंबानी (जिओ) असल्याचे प्रा. मकासरे यांनी स्पष्ट केले. यावेळी विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा प्रमाणपत्र व संविधान प्रत देऊन गौरव करण्यात आला.