संविधानिक मार्गानेच विरोध करावा

0

पुणे । सध्याचा सांस्कृतिक दहशतवाद हा हिंदुत्ववादी, ब्राह्मणी दहशतवाद असून त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या संविधानिक, संरचनात्मक मार्गानेच विरोध केला पाहिजे, असा सूर पाचव्या परिसंवादात उमटला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिति पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व स्टडीज सेंटर, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित 6 व्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनात समारोपाच्या दिवशी सकाळच्या सत्रात ‘सांस्कृतिक दहशतवादाची आव्हाने आणि प्रतिकाराची पर्यायी संरचना’ हा परिसंवाद झाला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सुरेन्द्र जोंधळे होते. या परिसंवादात श्रीरंजन आवटे, ताराचंद्र खांडेकर, देवेंद्र इंगळे, प्रल्हाद लुलेकर हे सहभागी झाले होते.

हिंदुत्ववाद व नवउदारमतवाद यांचे साटेलोट
केवळ भारतातच नव्हे तर जगभर सांस्कृतिक दहशतवाद उभा राहिला आहे. 90 च्या दशकात सुरू झालेल्या नवउदारमतवादी धोरणाने देशात याची सुरुवात झाली. म. गांधीची हत्या हिंदू राष्ट्रवाद्याने केली. इंदिरा गांधीची हत्या धार्मिक दहशतवादाने, राजीव गांधीची हत्या वांशिक दहशतवादाने तर दाभोळकर, कुलबर्गी व पानसरे यांची हत्या फासिस्ट दहशतवादाने केली, असे श्रीरंजन आवटे यांनी सांगितले. हिंदुत्ववाद व नवउदारमतवाद यांचे साटेलोटे असून हा दहशतवाद केवळ धार्मिक नाही तर आर्थिक, राजकीय व सामाजिक असल्यामुळे आपण तो ओळखला पाहिजे. त्यांचा विरोध करताना आपण हिंसा टाळली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

समाज आंदोलन उभारण्याची गरज
नरेंद्र मोदी हे सर्वात खोटे बोलणारे पंतप्रधान असल्याचे प्रल्हाद लुलेकर यांनी अनेक उदाहरणे देऊन सांगितले. गुजरात मॉडेल, संविधान बदलणे ते गांधीची चौथ्या गोळीने झालेली हत्या इथपर्यंत वैचारिक संभ्रम निर्माण करून एक नवा दहशतवाद जन्माला घातला जात आहे. सांस्कृतिक दहशतवादाविरोधात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन तत्त्वांसह सामाजिक न्यायासाठी लढा उभारला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. देशाची बहुलवादी, मानवतादी परंपरा लक्षात घेऊन वाढत्या बहुसंख्याकांच्या दहशतवादाला रोखले पाहिजे. हिंदू राष्ट्रवाद हा हिंसाचाराचा प्रसार करणारा आहे. लव्ह जिहाद, रोहित वेमुला ते भीमाकोरेगावपर्यंत हा हिंसाचार आपल्याला दिसला आहे. त्यामुळे हिंसेला थारा न देता मूलभूत प्रश्‍नांवर एकत्रितपणे ‘समाज आंदोलन’ उभारले पाहिजे, असे विचार अध्यक्षीय समारोप करताना सुरेन्द्र जोंधळे यांनी मांडले. या परिसंवादाचे सूत्रसंचालन किरण सुरवसे यांनी केले आणि आभार राजाभाऊ भैलुमे यांनी मानले.

भीमा कोरेगाव दंगल शासन प्रणीत
भीमा कोरेगावचा उभा राहिलेला संघर्ष हा नवा नाही. बुद्धकाळातही ब्राह्मण व श्रावकांमध्ये हा संघर्ष उभा राहिला होता. भीमा कोरेगाव दंगल ही शासन प्रणीत होती तशीच मराठा क्रांती मोर्चाची प्रेरणा ही कट्टर हिंदुत्ववादाची होती हे लक्षात घेऊन आंबेडकरी विचारांच्या लोकांनी याला संविधानिक मार्गाने विरोध केला पाहिजे, असे ताराचंद्र खांडेकर यांनी सांगितले. भीमाकोरेगावचा लढा इतिहासाचा विपर्यास असून तो लढा स्वराज्याच्या विरोधात होता असे मानले जात असले तरी पेशवे हे मोघलांचे मांडलिक असल्यामुळे ती लढाई छ. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा दुस्वास करणार्‍या ब्राह्मणी शक्तिविरोधी होती, असे देवेंद्र इंगळे यांनी सांगितले.