पिंपरी-चिंचवड : संविधानातील मूलभूत हक्क व अधिकारांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, या उद्देशाने ‘संविधान जनजागरण अभियान’ शहरात राबविले जात आहे. या अभियानाला रविवार (दि. 24) रोजी प्रारंभ होत आहे. पद्मयानी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट व संविधान दिन सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील सायन्स पार्कच्या सभागृहात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता या जनजागरण अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यांची लाभणार उपस्थिती
याप्रसंगी प्रा. डॉ. संजय गायकवाड यांचे ‘भारतीय संविधान प्रारूप समजून घेताना’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. प्रा. डॉ. राजाभाऊ भैलुने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी स्वराज अभियानाचे प्रदेश अध्यक्ष मानव कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, महिला व बाल विकास खात्याचे उपायुक्त राहुल मोरे, अशोक स्तंभाचे प्रणेते डॉ. अशोक शिलवंत, लेखक विजय जगताप, दिग्दर्शक नागनाथ खरात आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमात दुष्काळानं होरपळलेले खेड्यातलं जीवन टिपलेला आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘दिसाआड दिस’ हा नागनाथ खरात यांचा लघुपट दाखविण्यात येणार आहे.