भुसावळातील सभेत योगेंद्र यादव यांचा आरोप : संविधानावर बोलणे कधीपासून झाला गुन्हा ? पोलिसांसह सरकारला विचारला जाब
भुसावळ : देशाचे मूळ कापणे म्हणजे देशद्रोह असून सीएए व एनआरसी कायदा आणून सरकार देशाच्या एकात्मतेत फूट पाडण्याचे काम करीत असून संविधान वाचवणार्यांकडून देश तोडण्याचे काम होत आहे मात्र ते देश तोडतील मात्र आम्ही तो वाचवू, असे विचार राजकीय विचारवंत, कृषी चळवळीचे मार्गदर्शक योगेंद्र यादव यांनी येथे व्यक्त केले. खडका रोडवरील जीएनजी पार्कवर शनिवारी दुपारी चार वाजता त्यांची जाहीर सभा झाली. याप्रसंगी त्यांनी एनपीआर व एनआरसी कायदा जो पर्यंत मागे घेतला जात नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगत नथ्थूराम गोडसेंचे साथीदार सत्तेत असल्याची टिका करीत राष्ट्रपिता महात्मा गांधींचे साथीदार शाहीनबागमध्ये आंदोलन करीत असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शहा यांच्या कार्यपद्धत्तीवर त्यांनी टिकेचा आसूड ओढला.
संविधानावर बोलणे कधीपासून झाला गुन्हा ?
जळगाव येथील सभा आटोपल्यानंतर योगेंद्र यादव यांचे भुसावळातील सभास्थळी आगमन झाल्यानंतर उपस्थित जनसमुदायाने प्रचंड घोषणाबाजी करीत ‘जेएनयू तेरे खुनसे इन्क्लाब आएगा’ची जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मार्गदर्शन करताना यादव म्हणाले की, भुसावळातील सभा रद्द व्हावी म्हणून प्रयत्न झाले तर उमर खालीद यांना परवानगी नाकारण्यात आली शिवाय ते येथे नसल्याची आपल्याला खंत असून भारतीय संविधानावर बोलणे कधीपासून गुन्हा झाला आहे? हे सरकार व पोलिस प्रशासनाने सांगावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मी येथे तुमच्यासाठी आलेलो नाही तर माझ्या स्वतःसाठी आलो आहे, देशात आता नवी लहर, नवी हवा सुरू असून शंभरावर ठिकाणी शाहीनबाग सुरू असून देशाच्या भविष्यासाठी लोक शाहीनबागेत जात असल्याचे ते म्हणाले.
मोदी-शहांकडून देश तोडण्याचे काम
पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या कार्यपद्धत्तीवर टिकेचा आसूड ओढताना योगेंद्र यादव म्हणाले की, खुर्चीत बसलेल्यांकडून देश तोडण्याचे काम सुरू आहेत मात्र आम्ही आता देश जोडणार आहोत. 1942 मध्ये इंग्रजांविरूद्ध महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन छेडले होते तर आता ‘भारत जोडो’ आंदोलनाची वेळ आली आहे. शाह हा शब्द फारसीतून तर मोदी हा शब्द अरबी भाषेतून आल्याचा दावाही त्यांनी केला.
समाजातील दोन श्रेणींसाठी हा कायदा
योगेंद्र यादव म्हणाले की, सीएए कायदा मुळातच नागरीकांत दुफळी निर्माण करणारा आहे. एनआरसी व एनपीआर म्हणजे काही माहिती सांगू न शकल्यास किंवा चुकल्यास नागरीकांवर संशयाचा ठपका लावण्यात येणार आहे. तुम्हाला नोटीस देऊन तुमच्याकडे भारतीय असल्याचा पुरावा मागितला जाईल, जन्माचा पुरावा मागितला जाईल. आज एकाच धर्मातील नव्हे तर सर्वच धर्मातील लोकांना त्याचा त्रास होणार आहे. जे लोक पुरावा देवू शकत नाही अशांना विदेशी न्यायालयात पाठवण्यात येईल, असेही ते म्हणाले. कायद्याला समर्थन देणार्यांकडून शेजारील देशातील अल्पसंख्यांवर अन्याय होत असल्याने त्यांना अधिकार देण्यासाठी हा कायदा असल्याचे गोड समर्थन केले जात आहे मात्र ‘प्रताडीत अल्पसंख्य’ हा शब्द कायद्यात दाखवून द्यावा, असा दावा यादव यांनी करीत पाकिस्तानात हिंदू, सीख कुटुंबावर अत्याचार झाले असलेतरी नागरीकता देण्यासाठी हा कायदा नाही तर दोन श्रेणी बनवण्यासाठी हा कायदा बनवण्यात आल्याचे ते म्हणाले.
ही तर गांधी-गोडसेंची लढाई
एनपीआर व एनआरसी बाबत सखोल माहिती देताना योगेंद्र यादव म्हणाले की, जो पर्यंत सरकार हा कायदा मागे घेत असल्याची घोषणा करीत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. आमच्या संघर्षाची लढाई ही ‘दिवार’ चित्रपटाप्रमाणे असून गोडसेंचे साथीदार सत्तेत असून गांधीजींचे साथीदार शाहीनबागमध्ये असल्याने त्यांच्यात ही लढाई असल्याचे ते म्हणाले. एका हातात तिरंगा दुसर्या हातात संविधान व मनात अहिंसा, जन-गनका काम या पद्धत्तीने आता काम करायचे असून यापूर्वी कागद नही लिखायेंगे हा आपला नारा होता मात्र आता ‘कागद नही लिखायेंगे’ हा नारा असल्याचे त्यांनी सांगत माध्यमांची सरकारकडून गळचेपी होत असल्याचा आरोप केला.
कुठल्या एका धर्माचा हा विषय नाही -करीम सालार
करीम सालार म्हणाले की, हा कुठल्याही एका धर्माचा विषय नाही. आसाममध्ये भाजपाची सत्ता असतानाही सीएएला प्रचंड विरोध झाला. राज्यात सीएए लागू होणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याने त्यांचे आपण आभारी असल्याचे ते म्हणाले. समन्वयक मुकुंद सपकाळे म्हणाले की, आर्टीकल 14 व 15 चे उल्लंघण झाले असून लोक रस्त्यावर आल्यानंतरही पंतप्रधान दखल घेत नसल्याचे दुर्दैव आहे. एनआरसीसाठी आजोबा-वडिलांचा दाखला लागणार असून तो शहा-मोदींकडे तरी आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
डिग्री नसलेल्यांकडून पुराव्याची मागणी -प्रतिभा शिंदे
लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे यांनी आपल्या कणखत भाषणात, उमर खालीद यांना जिल्ह्यात येवू देण्यास परवानगी नाकारण्यात आल्याच्या बाबीवर टिका करीत आरएसएसचे कितीही लोक येवू द्या, आपण डगमगणार नाही, असे सांगत त्यांनी लोकतंत्रात विरोध करण्याचा प्रत्येकाला अधिकार असून आंदोलन वाढवण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. आमच्या मुलांवर 353 व 307 कलमान्वये गुन्हे दाखल झाले मात्र अजून ती जेल तयार नाही झाली जेथे आम्हाला तुम्ही टाकू शकाल, असेही त्या म्हणाल्या. तुमच्या लोकांनी 11 वेळा माफी मागून प्रति महिना 60 रुपये पेन्शन घेतल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धत्तीवर त्यांनी टिका केली. ज्यांच्याकडे स्वतःची डिग्री नाही ते आम्हाला पुरावा मागत असून मोदींनी रेल्वेचे खाजगीकरण अंबानी-अदानींसाठी केले असून देश स्वतंत्र होवून इंग्रज गेले मात्र काळे इंग्रज आता सत्तेत बसल्याचा आरोपही केला.
नाकर्तेपणासाठी आणले बिल -संतोष चौधरी
भाजपावाल्यांनी नाकर्तेपण लपवण्यासाठी काळा कायद्याचे बिल आणल्याचा आरोप माजी आमदार संतोष चौधरींनी केला. हा एक प्रकारे बाबासाहेबांच्या घटनेला हात लावण्याचा प्रयत्न असून ही धर्माची लढाई असल्याने आता सर्वांनी त्यात उतरणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. जनगणनेच्या सर्वेसाठी आलेल्यांना भुसावळकर हिसका दाखवतील व त्यांचे कपडेही प्रसंगी ते शिल्लक ठेवणार नाहीत, असे त्यांनी म्हणताच प्रचंड खळबळ उडाली.
आम्ही मालक, हे तर भाडेकरू -गफ्फार मलिक
आम्ही हिंदूस्तानचे मालक असून हे तर भाडेकरू असल्याची टिका गफ्फार मलिक यांनी मोदी-शहांचे नाव न घेता केली. आमच्याकडून पुरावे काय मागताय तर पूर्वजांच्या कबरीतून अस्थी काढू हवे तर डीएन करा, असेही मलिक म्हणाले.
यांची विचार मंचावर उपस्थिती
विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार संतोष चौधरी, प्रमुख वक्ता योगेंद्र यादव, लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे, मुकुुंद सपकाळे, गफ्फार मलिक, सचिन धांडे, विनोद देशमुख, मौलाना नूर आलम, आदींची उपस्थिती होती.
सभा यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
सभा यशस्वीतेसाठी सलीम चुडीवाले, मुन्वर खान, साबीर शेख, दनिश पटेल, फारूक नजीर, इमरान खान, आबीद भाई, फुरकान अश्रफ कुरेशी, फरहान भाई तसेच संविधान बचावो समितीच्या सदस्यांनी परीश्रम घेतले. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी सभेच्या बंदोबस्ताचा आढावा घेतला. सभास्थळी पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे रामकृष्ण कुंभार यांनी कडेकोट बंदोबस्त लावला होता. सभास्थळी मेटल डिटेक्टरमधून प्रत्येकाची तपासणी केल्यानंतर आत सोडण्यात आले.