संवेदनशील मतदान केंद्राचे पुरावे द्या : संदीप पाटील

0

पुणे : राजकीय पक्षांनी मतदार संघातील एखादे मतदान केंद्र संवेदनशील असल्याची तक्रार केल्यानंतर संबंधित परिसर संवेदनशील का आहे, हे राजकीय पक्षांना पुरावे देऊन सिद्ध करावे लागणार आहे. त्यानंतरच पोलिसांकडून चौकशी होऊ न मतदान केंद्र आणि परिसर संवेदनशील म्हणून जाहीर केले जाईल. त्यामुळे संवेदनशील मतदान केंद्राबाबत तक्रार केल्यानंतर राजकीय पक्षांना त्याबाबचे पुरावेही द्यावे लागणार आहेत.
राजकीय पक्षांच्या बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये राजकीय पक्षांनी काही मतदान केंद्रे ही संवेदनशील म्हणून जाहीर करण्याची मागणी केली. त्यावेळी पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी राजकीय पक्षांनी तक्रार केली, की लगेच कोणतेही मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तक्रार करणार्‍या राजकीय पक्षांना संबंधित परिसर कसा संवेदनशील आहे, हे सिद्ध करून दाखवावे लागणार आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्यामुळे केवळ तक्रार करून चालणार नाही, तर त्याबाबतचा तपशील राजकीय पक्षांना द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर पोलिसांकडूनही चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरच मतदान केंद्र आणि परिसर संवेदनशील म्हणून घोषित करण्यात येईल. त्यानुसार पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल, असेही पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले.