संशयास्पद पुरलेला चिमुरडीचा मृतदेह आढळला!

0

देहूरोड पोलीस ठाण्यात अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल

देहूरोड : लोणावळ्यात दोन महिन्याच्या बालकाला आईनेच विहिरीत टाकून त्याची हत्या केल्याची संतापजनक घटना ताजी असताना देहूरोड येथेही अशाच प्रकारचा मातृत्त्वाला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे. आकुर्डी ते देहूरोड रेल्वे स्थानकांदरम्यान बापदेवनगरजवळ लोहमार्गालगतच्या खिंडीत दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी महिलांनी तीन महिन्यांचे बाळ पुरल्याची घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. यानंतर पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत तीन महिने वयाच्या बालिकेचा हा मृतदेह उकरून काढला. याप्रकरणी संबंधित अनोळखी दोन्ही महिलांविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागरिकाच्या सतर्कतेने घटना उघड
या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास पांढर्‍या रंगाच्या एका दुचाकीवरून आलेल्या दोन मध्यमवयीन महिला रेल्वे रुळाच्या कडेला दुचाकी लावून लहान बाळासह खिंडीच्या दिशेने गेल्या होत्या. सुमारे अर्धा तासानंतर त्या परतल्या. तेव्हा त्यांच्याकडे बाळ नव्हते. येथे राहणारे राजू गोविंद साळवे यांनी हा प्रकार पाहिला होता. त्यांनी याबाबत शनिवारी रात्री देहूरोड पोलिसांना माहिती दिली. प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी शहानिशा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रविवारी सकाळी पोलिसांनी या ठिकाणी येऊन शहानिशा केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. राजू साळवे यांच्या सतर्कतेने ही घटना उघड झाली आहे.

घटनास्थळी पोलीस पहारा
रविवारी सकाळी नायब तहसीलदार संजय भोसले, तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव माडगुळकर, पोलीस निरीक्षक अरूण मोरे यांच्या उपस्थितीत संबंधित खड्डा पुन्हा खोदण्यात आला. यावेळी खड्ड्यात स्त्री जातीचे तीन महिने वयाचे अर्भक मृतावस्थेत आढळून आले. संबंधित मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविण्यात आला आहे. डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

पोलीस तपास सुरू
देहूरोड पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासाअंती दोन्ही अनोळखी महिलांवर भादंवि कलम 318 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. अनैतिक संबंधातून या बाळाचा जन्म झाला असावा, किंवा स्त्री जातीचे बाळ असल्याने द्वेषापोटी त्याची हत्या करून विल्हेवाट लावण्याचा हा प्रकार असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस सर्व बाबींची पडताळणी करून तपास करत आहेत.