संशोधनाात विद्यार्थी, प्राध्यापकांचा सक्रीय सहभाग गरजेचा : डॉ. विद्यासागर

0

नारायणगाव । भविष्यकाळात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार असून त्यासाठी नवनवीन पदार्थांची गरज भासणार आहे. दैनंदिन जीवनात सूक्ष्मपदार्थाच्या वापराने प्रत्येकाचे जीवनमान सुधारणार आहे. यासाठी नवसंशोधकांनी वेगवेगळ्या पदार्थांच्या गुणधर्माचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थी व प्राध्यापकांचा सक्रिय सहभाग गरजेचा आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले. संशोधन परिषदेच्या उद्धघाटनप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. सुभाष वाडेकर यांनी महाविद्यालयातील संशोधन प्रकल्प व विकास यांची माहिती दिली. याप्रसंगी डॉ. विकास मथे, डॉ. पंडित शेळके, उपप्राचार्य संजय वाकचौरे, डॉ. अण्णासाहेब काकडे, डॉ. सखाराम आघाव, डॉ. अशोक भिसे, डॉ. वासुदेव कुलकर्णी, प्रा. अरुणा वाघोले, डॉ. सुधीर तांबे, डॉ. सविता रहांगडाळे, डॉ. विलास गोरडे, डॉ. रमेश भिसे व डॉ. अजित सुर्यवंशी उपस्थित होते.

संशोधनपत्रिकेचे प्रकाशन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने ज्ञानेश्‍वर ग्रामोन्नती मंडळाच्या आळे येथील बी. जे. कॉलेजने पदार्थाच्या विशेष गुणवर्णनाच्या आधुनिक पध्दती या विषयावर दोन दिवसांच्या राज्यस्तरिय परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेस अमरावती, नागपुर, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, पुणे, मुंबई या सात विद्यापीठातील 101 प्राध्यापक उपस्थित होते. या परिषदेचे उद्घाटन डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व संशोधनपत्रिकेचे प्रकाशन करून झाले.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन
विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त पत्रिकेत 68 संशोधन निबंध प्रसिध्द झाले आहेत. राज्यस्तरिय परिषदेमध्ये अशा प्रकारचा प्रतिसाद क्वचितच आढळतो, असे मत प्राचार्य वाडेकर यांनी व्यक्त केले. डॉ. विकास मते यांनी नॅनोटेक्नालॉजी मधील संशोधन व त्याचे फायदे यावर मार्गदर्शन केले. या परिषदेसाठी डॉ. उमाकांत तुंबरफळे, डॉ. एस. के. गोरे, डॉ. एल. एस. रावणगावे, डॉ. बी. डी. गचांडे, डॉ. ए. एन. कल्याणकर, डॉ. नितीन साळी, डॉ. बी. एस. मुंडे व डॉ. सोपान राठोड या तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केले.