संसदीय कामकाजाची सध्या अधोगती – नारायण राणे

0

जाधवर ग्रुपच्या 23 व्या वर्धापनदिनानिमित्त जीवन गौरव पुरस्कार प्रदान

पुणे : विचारातून विकास घडवतील, अशा प्रकारचे वक्ते तयार होणे गरजेचे आहे. कोणत्याही विषयाला न्याय देणारा वक्ता होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे. आजच्या लोकशाहीत संसदीय कामकाजाची अधोगती झाली आहे. पूर्वी जो दर्जा होता, तसा दर्जा आज राहिलेला नाही. त्यामुळे उत्तमप्रकारे अभ्यासपूर्ण विषय मांडणारे वक्ते होण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करायला हवे, असे मत माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले. नर्‍हे येथील मानाजीनगरमधील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या 23 व्या वर्धापनदिनानिमित्त प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुलातील सन्मान सोहळ्यात नारायण राणे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी श्रीनिवास पाटील, आ. भीमराव तापकीर, सुरेश पाटील, विद्याधर अनास्कर, प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, अ‍ॅड. शार्दुल जाधवर उपस्थित होते.

विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार

भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार, घोडावत ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत आणि  कृषीविकास प्रतिष्ठानचे उद्योजक विश्‍वजीत मोकाशी यांना उद्योग क्षेत्रातील पुरस्कार, प्रतापसिंह जाधव यांना पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्कारांचे स्वरुप होते. संस्थेच्या सामाजिक कार्याचा अहवाल असलेले ‘उडान’ या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी झाले.

मराठा आरक्षणासाठी नोव्हेंबरपर्यंतची वेळ

राणे म्हणाले, मराठा आरक्षण समितीचा मी अध्यक्ष होतो. त्याचा अहवाल मी दिला असून सरकारने नोव्हेंबरपर्यंतची वेळ दिली आहे. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी अशी भूमिका राणे यांनी मांडली. मराठा आरक्षणावरून सरकारवर टीका केली जात आहे. त्या प्रश्‍नावर त्यांनी ही भूमिका मांडली. भाजपच्या एका नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विष्णूचा अवतार म्हटले आहे. या प्रश्‍नावर मी काही बोलणार नसून कोणी काही म्हणेल यावर मी प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

गुणवत्ता हा चिंतेचा विषय

डॉ. कदम म्हणाले, चांगल्या शैक्षणिक संस्थांचे वय वाढणे, ही समाजाच्या दृष्टीने चांगली बाब आहे. महाविद्यालयाची गुणवत्ता संशोधनावर अवलंबून असून प्रत्येक संस्थेने याकडे लक्ष द्यायला हवे.

घोडावत म्हणाले, यशस्वीतेमध्ये शॉर्ट कट असता कामा नये. कष्ट, उत्तम काम, योगदान, दृष्टीकोन या गोष्टी यशस्वीतेच्या गाडीची चार चाके आहेत. त्यामागे शिक्षण हेच मुख्य हत्यार असून प्रत्येकाने शिकत राहिले पाहिजे.

श्रीनिवास पाटील म्हणाले, ग्रामीण भागातून आलेल्या अनेकांनी आपल्या चांगल्या कार्यातून समाज उभारणीचे काम केले आहे.त्यामध्ये डॉ.जाधवर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

विश्‍वगुरू बनण्याच्या दृष्टीने वाटचाल

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, भारतीय संस्कृती आणि अमेरिकन तंत्रज्ञान यांचा संगम साधून काम करण्याकरीता आम्ही कार्यरत आहोत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आजच्या पिढीला सशक्त करून भारत विश्‍वगुरू करण्याच्या दृष्टीने वाटचाल करण्याकरीता तळागाळात शिक्षण पोहोचायला हवे.