संसदेतही कास्टिंग काऊच

0

रेणुका चौधरींचे धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली : बलात्कार आणि कास्टिंग काऊचवरुन प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यावरुन सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत असताना काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनीही धक्कादायक वक्तव्य केले आहे. प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होते. संसददेखील यास अपवाद नाही. कास्टिंग काऊच प्रत्येक क्षेत्रात होते, असे चौधरी यांनी म्हटले आहे.

अनेकजणी बोलत आहेत
रेणुका चौधरी म्हणाल्या, कास्टिंग काऊच फक्त चित्रपटसृष्टीत होते असे नाही. असे प्रकार प्रत्येक क्षेत्रात होत आहेत आणि हे कटू सत्य आहे. संसदेत किंवा अन्य ठिकाणी असे प्रकार होत नाहीत, असे समजू नका. सध्या याबद्दल आवाज उठवला जात आहे. अनेकजणी कास्टिंग काऊचविषयी धैर्याने बोलत आहेत. त्यांच्यावर झालेला अन्याय समोर येऊन सांगत आहेत.

सरोज खान यांचा माफीनामा
सरोज खान यांनी बलात्कार आणि कास्टिंग काऊचबद्दल केलेल्या विधानाने सध्या खळबळ माजली आहे. चित्रपटसृष्टीत बलात्कार आणि कास्टिंग काऊच होत असले, तरी येथे रोजगारही मिळतो. ज्यांच्यासोबत असे घडते त्यांना चित्रपटसृष्टीत सोडून देत नाही. उलट त्यांना काम दिले जाते, असे सरोज खान म्हणाल्या होत्या. सरोज खान यांच्या विधानाने मोठा वाद झाला. त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीकाही झाली. यानंतर त्यांनी माफी मागितली.