नवी दिल्लीः राज्यसभेत १२७ वे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर अभूतपूर्व असा गदारोळ झाला. सरकारने आणलेल्या विमा सुधारणा विधेयकासह विविध मुद्द्यांवरून विरोधी खासदारांनी घोषणाजी केली आणि सभागृहाच्या मध्यभागी पोहोचले. तसंच विरोधी पक्षाच्या खासदारांनी कागदपत्रे फाडून ती सभागृहात उधळली. राज्यसभेत बुधवारी घडलेल्या या घटनेवरून आता राजकारण तापलं आहे.
राज्यसभेत मार्शल्सना बोलावून विरोधी पक्षाच्या खासदांना मारहाण केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. मार्शल्सच्या वेशात बाहेरची माणसं बोलावून खासदारांना मारहाण केली गेली, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. या घटनेविरोधात विरोधी पक्षाचे नेते राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना भेटले. एकीकडे विरोधी पक्षांनी सरकारवर गंभीर आरोप केले असताना आता राज्यसभेत बुधवारी नेमकं काय घडलं? याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. एएनआयने राज्यसभेतील घटनेचे सीसीटीव्ही फुटेजचे तीन ट्वीट केले आहेत. यात गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांना रोखण्यासाठी राज्यसभेत मार्शल्सना पाचारण करण्यात आल्याचं दिसतंय.
राहुल गांधींनी सरकारवर केले गंभीर आरोप
संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर विरोधी पक्षांनी गुरुवारी संयुक्त मोर्चा काढला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात डझनहून अधिक राजकीय पक्ष सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधी यांनी सरकारवर गंभीर आरोप केले, तसेच सभागृहात खासदारांसोबत गैरवर्तन झाल्याचेही ते म्हणाले. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, राज्यसभेत पहिल्यांदाच खासदारांना मारहाण करण्यात आली, बाहेरून लोकांना बोलावले गेले आणि खासदारांसोबत धक्का-बुक्की करण्यात आली. सभापतीची जबाबदारी सभागृह चालवण्याची असते. विरोधकांची बाजू सभागृहात का ठेवू शकत नाही?
राहुल गांधी म्हणाले, देशाचे पंतप्रधान आज देश विकण्याचे काम करत आहेत. देशाचा आत्मा दोन-तीन उद्योगपतींना विकला जात आहे. विरोधक संसदेत काहीही बोलू शकत नाहीत. देशातील 60 टक्के लोकांचा आवाज दाबला जात आहे, राज्यसभेत खासदारांशी गैरवर्तन करण्यात आले. आम्ही सरकारसोबत पेगासस मुद्द्यावर चर्चा करण्यासंदर्भात बोललो, आम्ही शेतकरी आणि महागाईचा मुद्दा उचलला. तसेच, ही लोकशाहीची हत्या आहे. असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
५५ वर्षांच्या कारकिर्दीत असं काही बघितलं नाही : शरद पवार
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावर टीका करताना आपल्या ५५ वर्षांच्या कारकिर्दीत असं काही बघितलं नसल्याचं म्हटलं आहे. “संसदेतील माझ्या ५५ वर्षांच्या करिअरमध्ये महिला खासदारांवर ज्याप्रकारे हल्ला करण्यात आला तसं कधीच पाहिलेलं नाही. सभागृहात बाहेरुन ४० पुरुष आणि महिलांना आणण्यात आलं. हे वेदनादायी असून लोकशाहीवर हल्ला आहे. सभागहात हे योग्य झालं नाही,” असं शरद पवार म्हणाले आहेत.