नवी दिल्ली : खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडिया कर्मचार्याला मारहाण केल्याचे प्रकरण सोमवारी संसदेतही गाजले. एअर इंडियाने मद्यधूंद अवस्थेत गैरवर्तन करणार्या विनोदवीर कपिल शर्मा याच्यावर कारवाई केली नाही. मग आता रवींद्र गायकवाड यांच्यावरच कारवाई का झाली, असा सवाल शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी लोकसभेत उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे एअरइंडियाच्या हवाईसुंदरीने खासदार रवींद्र गायकवाड यांची बाजू घेतल्यानतंर शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. हीच आक्रमकता सेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनीही दाखवली.
इकॉनॉमी श्रेणीमध्ये बसवल्याच्या रागातून एअर इंडियाच्या व्यवस्थापकाला चपलीने मारहाण करणारे उस्मानाबादचे शिवसेना खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्याविरुद्ध फास आवळला गेला आहे. खासदार गायकवाड यांच्यावर हवाई प्रवासबंदी घालण्याचा निर्णय एअर इंडियासहित भारतीय विमान कंपन्यांच्या महासंघाने (फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्स : एफआयए) घेतला होता. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध थेट सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याबद्दलचा गुन्हा दाखल केला. खासदार गायकवाड यांच्यावर टीका होत असतानाच शिवसेनेने मात्र खासदारांचे समर्थन केले आहे.
सोमवारी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी लोकसभेत गायकवाड यांच्यावरील बंदीचा मुद्दा मांडला. विनोदवीर कपिल शर्मानेही मद्यधूंद अवस्थेत विमानात गैरवर्तन केले होते. पण त्याच्यावर बंदी घातली गेली नाही, असे अडसूळ यांनी निदर्शनास आणून दिले. गायकवाड यांच्यावरील कारवाईवरून अडसूळ आक्रमक झाले होते. अडसूळ यांनी बंदीचा मुद्दा उपस्थित केल्यावर नागरी विमान वाहतूक खात्याचे मंत्री अशोक गजपती राजू यांनी या प्रश्नावर उत्तर दिले. नियम हे सर्वांसाठीच समान आहेत, असे राजू यांनी यावेळी स्पष्ट केले. हवाई वाहतुकीदरम्यानच्या सुरक्षेसाठी आपल्याकडे कठोर नियम आहेत. पण या नियमांच्या कचाट्यात खासदार अडकेल असे स्वप्नातही वाटले नव्हते असे त्यांनी सांगितले.
मंत्र्यांनी उत्तर दिल्यावरही खासदार अडसूळ यांनी पुन्हा हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. यावर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. मी तुम्हाला प्रश्न उपस्थित करू दिला आहे. मंत्र्यांनीही तुम्हाला उत्तर दिले. आता यावर तुम्हाला तोगडा हवा असेल तर तुम्ही मंत्र्यांसोबत बसून चर्चा करावी, असे महाजन यांनी सांगितले. संसदेत खासदार गायकवाड यांच्यावरील बंदीचा मुद्दा गाजत असतानाच दुसरीकडे उस्मानाबादमध्ये गायकवाड यांच्या समर्थनार्थ सोमवारी बंदची हाक देण्यात आली होती.