संसारात ध्यानालाच महत्व

0

भुसावळ : ध्यानाशिवाय संसारात कोणतेच काम शक्य होत नाही. ध्यान प्रत्येकाला लागते मात्र त्यासाठी मनाची तयारी असावी लागते. स्वयंपाक करणारी गृहिणी, गाडीचा चालक, पायी चालणारा माणूस, छायाचित्रकार, कीर्तनकार आदींचे ध्याने, चित्त एकरुप व एकाग्र असते. म्हणजेच आपल्याला ध्यान लागते. परमेश्‍वर चिंतन करतांना आपल्या मनावर संसाराचा प्रभाव असतो. म्हणून आपल्याला ध्यान लागत नाही, असे महत्वपूर्ण विचार महामंडलेश्‍वर जनार्दन हरिजी महाराज यांनी व्यक्त केले. ‘भज गोविंदम’ या स्तोत्रावर आधारित कार्यक्रमात निरुपण करतांना ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, मोबाईल हॅण्डसेट व त्यासाठी लागणारे सिमकार्ड साठीही मोबाईल टॉवरची रेंज आवश्यकत असते. त्याचप्रमाणे भगवंत प्राप्तीसाठी संतांसह आपल्याला चांगल्या संगतीची गरज महत्वाची आहे. कुसंगतीचा त्याग करुन सत्संगी माणसाची साथ असल्याशिवाय भगवंताची प्रचिती येत नाही.

सतपंथ परिवारातर्फे आयोजन
गेल्या सात दिवसांपासून येथील नंदनवन कॉलनीत न्यू जवाहर डेअरी व समस्त सत्पंथ परिवारातर्फे आयोजित कार्यक्रमात शहरातील भक्तांसह परिसरातील असंख्य भाविकांच्या उपस्थितीने भक्ती मंडप खचाखच भरलेला होता.

आमदार संजय सावकारेंसह नगराध्यक्षांची उपस्थिती
दररोज महाराजांच्या आगमनप्रसंगी युवा भक्त कार्यकर्त्यांनी गुढी उभारुन, कलश धारण करुन, मेणबत्ती प्रज्वलित करुन, आरतीने तसेच आज सर्वांनी भगवे फेटे बांधून स्वागत केले. या कार्यक्रमाला आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक पिंटू कोठारी, पिंटू ठाकूर, जामनेर येथील शाम चैतन्य महाराज, हभप नितीन महाराज, हभप प्रविण महाराज यांसह शेकडो भाविक उपस्थित होते.

छत्रपतींचा आदर्श घ्यावा
मनुष्याने जीवन जगतांना योग्य व अयोग्य याचा विचार केला पाहिजे. जीवन किती जगावे हे आपण ठरवू शकत नाही परंतु ते कसे जगावे हे आपण ठरवू शकतो. त्यामुळे जीवनाचे मुल्यमापन करायचे असल्यास सत्संग महत्वाचा आहे. माणसाने केवळ वयाने व वाढता कर्तृत्वाने मोठे व्हावे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अभ्यासून तरुणांनी त्यांच्या कार्याचे अनुसरण करण्याचे प्रतिपादन जनार्दन महाराज यांनी केले. कथेपूर्वी सुकदेव पाटील यांनी गुरुपूजन तर सुरेश पाटील यांनी ग्रंथपूजन केले. सुत्रसंचालन शैलेंद्र महाजन यांनी केले.