संस्कारांच्या बळावर घडले रयतेचे राज्य

0

भुसावळ। राजमाता जिजाऊंनी दिलेल्या संस्कारांच्या बळावर शिवरायांनी रयतेचे राज्य घडवले. एखाद्या शाळेच्या विद्यार्थ्याला शिवरायांचे पूर्ण नाव काय? असा प्रश्न विचारल्यावर तो जेव्हा ‘छत्रपती शिवाजी शहाजीराजे भोसले’ असं उत्तर देतो तेव्हा इतिहास जिवंत असल्याचा अभिमान वाटतो, असे परखड मत भालोद महाविद्यालयाचे प्रा. जतीन मेढे यांनी येथे व्यक्त केले. जय गणेश फाउंडेशनतर्फे आयोजित ‘द्वारकाई’ व्याख्यानमालेत तृतीय पुष्प गुंफताना ‘अशी घडतात चरित्रे’ या विषयावर ते बोलत होते. भुसावळ हायस्कूलचे चेअरमन ए.एन.शुक्ला यांनी अध्यक्षस्थान भूषवले.

विचारमंचावर यांची होती उपस्थिती
विचारमंचावर प्राथमिक विभागाचे चेअरमन जीवराम चौधरी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा साक्षरता समिती सदस्य गणेश फेगडे, जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विसपूते, साहित्यिक चंद्रकांत अंबाडे, मुख्याध्यापक हितेंद्र धांडे, पी.ए.शुक्ला यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक समन्वयक अरुण मांडाळकर यांनी केले. सूत्रसंचालन गायत्री सरोदेंनी केले. वक्त्यांचा परिचय मनीष गुरचळ यांनी दिला. आभार विनोद शेजवळ यांनी मानले.

मुलाच्या यशासाठी बापाने जागावे
शिक्षणाचे धडे गिरवताना बालपणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केडुस्कर गुरुजी भेटले. यावेळी त्यांनी बाबासाहेबांना स्वहस्ताक्षरातील बुद्ध चरित्र भेट दिले. त्यातून त्यांचे चरित्र घडण्यास मदत झाली. मुलाच्या यशासाठी बापाने रात्र जागून काढली पाहिजे, असा संदेश बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांनी दिला. बाबासाहेबांनी मुंबईत 50 हजार ग्रंथसंपदा ठेवण्यासाठी राजगृह बांधले. त्यात त्यांनी केडुस्कर गुरुजींनी दिलेले ‘बुद्धचरित्र’ जीवापाड जपून ठेवले. ग्रंथांवर प्रेम करावे, असा विचार त्यांच्या याकृतीतून मिळतो.

चरित्रातून समृद्ध माणसं घडतात
वर्ध्याला एकदा सानेगुरुजींची सभा होती. ती ऐकण्यासाठी बाबा आमटे नागपूरहून ट्रेनने निघाले. मात्र, ट्रेनला विलंब झाल्याने सभा ऐकण्याची संधी हुकली. किमान सानेगुरुजींचे दर्शन तरी घ्यावे म्हणूून रेल्वेस्थानकावर गेले. पण ट्रेन मार्गस्थ झाली. बोगीतूनच पाठमोर्‍या स्थितीत त्यांचे दर्शन झाले. त्यातून प्रेरणा घेऊन बाबा आमटेंनी आनंदवन उभारले. यामाध्यमातून त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्यात आपले आयुष्य खर्ची घातले. तसेच महात्मा ज्योतीबा फुले यांनी शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचे काम केले. तर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवला असल्याचे प्रा. मेढे यांनी सांगितले.