संस्काराचे ऋण विसरूच शकत नाही – प्रकाश मोरे

0

नागोठणे : जनसेवा करण्याचा पाया प्राथमिक शाळेत शेलार गुरुजींनी केलेल्या संस्कारामुळे मजबूत झाला होता व त्यामुळेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाची सेवा करण्याची संधी मला मिळाली असून गुरुजींचे ऋण कधीही विसरू शकत नाही असे भावपूर्ण उद्गार ग्राम पंचायत सदस्य तथा शिक्षण सभापती प्रकाश मोरे यांनी काढले. येथील निवृत्त शिक्षक दशरथ शेलार गुरुजी यांचा अमृत महोत्सवी सोहळा नुकताच शांतीनगरमध्ये पार पडला, त्यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मोरे बोलत होते. गुरुजींनी आज 75 वर्षे पूर्ण केली असली तरी दुसर्‍याला मौलिक असे ज्ञान देण्याचे कार्य ते आजही आनंदाने पार पाडत असून त्यांचा शतकी महोत्सव साजरा करण्याचे भाग्य आम्हाला लाभणारच, असा विश्वास मोरे यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला ग्रा. पं. सदस्या सुप्रिया महाडीक, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे दत्ताराम झोलगे, जयराम पवार, जांबेकरगुरुजी, विमल शिंदे, दयाराम ताडकर, सुधाकर जवके, सुजाता जवके, अजित दळवी, प्रशांत पाटील, शांताराम शहासने, चव्हाण, डॉ. राव, उल्हास शिंदे, कीर्तिकुमार कळस, नितीन पत्की आदी मान्यवरांसह गुरुजींचे नातेवाईक तसेच हितचिंतक उपस्थित होते. यावेळी अनेक वक्त्यांनी शेलार गुरुजींच्या कार्यावर भाषणे केली. या कार्यक्रमात जनसुशा अपार्टमेंटमधील 75 सुवासिनींनी शेलार गुरुजींचे औक्षण करून त्यांचेवर पुष्पवृष्टी केली.