आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रतिपादन
पिंपरी : आदिवासी संस्कृतीमध्ये असणार्या चांगल्या गोष्टी इतर समाजाला दिल्या पाहिजेत. चांगल्या गोष्टी, चांगले काम समाजाला देऊन त्यांच्याकडूनही चांगले तेच घेतले पाहिजे. त्यामुळे अशा महोत्सवातून ही संस्कृती लोकांना समजून येईल. त्यामुळे हे देण्याचे कार्य अशा उपक्रमाने होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मागासवर्गीय कल्याणकारी संस्कृती व खाद्यदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या महोत्वाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार जगताप बोलत होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने 23 ते 25 नोव्हेंबर दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये आदिवासी संगीत/संस्कृती व खाद्यदर्शन यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. हे प्रदर्शन प्रभाग क्र.29,पिंपळे गुरव, येथील सृष्टी चौकाजवळील क्रीडांगणाच्या जागेत करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी जैव विविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौगुले, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य सागर आंगोळकर, लक्ष्मण उंडे, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, चंदा लोखंडे, माधवी राजापूरे, शारदा सोनवणे, माजी नगरसदस्य रामदास बोकड, शंकर जगताप, भाऊसाहेब सुपे, माजी नगरसदस्या आशा सुपे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहशहर अभियंता प्रविण तुपे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुर्गुडे, मुख्य संयोजक तथा कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, सह्याद्री आदीवासी महिला संघाच्या अध्यक्षा गौरी गोंठे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम सुपे, सुदाम मराडे, महेश जगताप, मनीष कुलकर्णी, मधू रणपिसे आदी उपस्थित होते.
त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवाव्यात
आमदार लक्ष्मण जगताप पुढे म्हणाले की, गावाकडून खूप आदिवासी लोक शहरात येतात. त्यांना तुमचा आधार वाटतो. असाच तुमचा आधार वाटत राहावा आणि आपल्या आदिवासी बांधवांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल यासाठी लोकप्रतिधीनी प्रयत्न करावेत. आदीवासींसाठी शासन खूप मोठ्या प्रमाणात योजना राबवित असते. अशा योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहचविल्या पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याबाबतची पुस्तिका शासन दरबारी उपलब्ध आहे. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठीप्रयत्न केले पाहिजेत, तरच खर्या अर्थाने समाज पुढे जाईल. कार्यक्रमाची सुरूवात आदिवासी शोभा यात्रेने झाली. त्यानंतर आदिवासी तारपा नृत्य कला सादर करण्यात आली. तूरनाच नृत्य व शिवसह्याद्री ढोल पथकाचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसदस्य भाऊसाहेब सुपे यांनी केले, तर सूत्रसंचलन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले.