संस्कृतीला भौगोलिक आणि राजकीय सीमांमध्ये अडकवता येत नाही

0

पुणे । आपल्या भारतीय संस्कृतीत असणारी विविधता हेच या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. ते समजून घेऊन येणार्‍या आव्हानांवर मात करायला हवी. संस्कृतीला भौगोलिक आणि राजकीय सीमांमध्ये अडकवता येत नसल्याचे मत जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी व्यक्त केले. सरहद आणि खडके फाऊंडेशनतर्फे कल्हण पंडित लिखित आणि डॉ. अरुणा ढेरे-प्रशांत तळणीकर अनुवादित ’राजतरंगिणी’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी व्होरा बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिरात शनिवारी झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया, सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, खडके फाऊंडेशनचे अध्यक्ष संजीव खडके, श्यामची आई फाऊंडेशनचे अध्यक्ष भारत देसडला, प्रशांत तळणीकर उपस्थित होते.

भविष्यात भारत नक्कीच बदलेल
रोजगार उपलब्ध करून देणे, प्रत्येकाला चांगले अन्न, स्वच्छ पाणी मिळेल, अशी व्यवस्था करणे आणि गुणवत्ता पूर्ण जगण्याची संधी प्रत्येक नागरिकाला मिळणे ही आपल्या समोरची काही आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करायची असेल तर त्या-त्या भागातील संस्कृती समजून घेत आपल्याला बदलावे लागणार आहे. समोर एक उद्दिष्ट ठेऊन त्या अनुषंगाने विचार प्रक्रियाही बदलावी लागेल. दुर्लक्षित घटकांकडेही लक्ष द्यावे लागेल, असे व्होरा यांनी सांगितले. येणार्‍या काळात भारताचे चित्र नक्कीच बदलेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

साहित्य हा संस्कृतीचा गाभा
राजतरंगिणी या पुस्तकात मानवी भावभावनांचे मिश्रण आहे. ते मराठीत येण्याची गरज होती. सांस्कृतिक आदान प्रदान साहित्यातून घडत आले आहे. साहित्य हा संस्कृतीचा गाभा आहे. आपल्याकडे खूप भाषा आहेत. पण त्यांचे आदान प्रदान होण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही, ती सुरू होणे गरजेचे आहे, असे मत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते काश्मिरी लेखक प्राणकिशोर कौल यांनी यावेळी व्यक्त केले.

एकत्र पुढे जाणे हीच संस्कृती
काश्मीरकडे राजकीय आणि धार्मिक नजरेतून पाहिले जाते, हिंदू विरुद्ध काश्मीर याही पद्धतीने काश्मीरकडे पाहिले जाते. हे थांबायला हवे. भारतीय संस्कृती ही अनेकविध संस्कृतींनी बनली आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणे हेच आपल्या संस्कृतीत दिसते, असे फिरोदिया यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरजा आपटे यांनी तर आभार शैलेश वाडेकर यांनी मानले.